ठाणे : ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानांतर्गत खड्डेमुक्त शहर, स्वच्छता, सौंदर्यीकरण, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ही महत्वाकांक्षी ठाण्यात कामे सुरू आहेत. या कामांसाठी दोन ते सहा महिन्यांचा मर्यादित कालावधी ठेवण्यात आला आहे. शहरात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा दिवसनिहाय आढावा घेणे अपेक्षित असून त्यासाठी वॉर रुम तयार केली जात असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाचे शुभारंभ काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेने या अभियानांतर्गत विविध विकासकामे हाती घेतली आहे. त्यांसदर्भाची माहिती आयुक्त बांगर यांनी दिली. ठाणे शहरात खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, स्वच्छतागृहांची सफाई यासह विविध नागरी कामे हाती घेण्यात आली आहे. या कामांचा आढावा वॉर रुमच्या माध्मयातून घेतला जाणार आहे. या कामांची छोट्या बाबींमध्ये विभागणी करुन जाणार असून त्यांची कालमर्यादा निश्चित असल्याने दैनंदिन कामाची प्रगती पाहिली जाणार आहे, असे बांगर यांनी सांगितले.
तसेच वॉर रुमच्या माध्यमातून कामांचा प्रगती अहवाल प्राप्त होईल. प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असतानाच एका बाजूला प्रकल्प अंमलबजावणीची गती, कामाचा दर्जा याची अद्ययावत माहिती उपलब्ध होईलच, त्याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचा विचार करुन त्याबाबत कामाच्या धोरणात सुधारणा करणे शक्य होणार असल्याचे बांगर यांनी नमूद केले.
खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, स्वच्छतागृहांची सफाई या चारही कामांसाठी प्रत्येकी एक अधिकारी नियुक्त करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कामांचा दैनंदिन प्रगती अहवाल सादर केला जाईल. हा अहवाल वॉर रुमच्या माध्यमातून आयुक्तांना केव्हाही पाहणे सहज शक्य होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.