कल्याण : टिटवाळ्यात गेल्या महिनाभरापासून बेकायदा बांधकामांच्या विरुध्द तोडकामाची मोहीम सुरू आहे. बुधवारी पालिकेच्या अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने टिटवाळा वासुंद्री रस्त्यावरील चाळींच्या उभारणीसाठी बांधलेली ६० हून अधिक जोत्यांची बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकली. या भागात सुरू करण्यात आलेले एका चाळीचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

मांडा टिटवाळा येथील वासुंद्री गाव रस्त्यावर स्मशानभूमीच्या पाठीमागील भागात बेकायदा चाळींच्या उभारणीसाठी भूमाफियांनी ६० हून जोत्यांची बांधकामे केली आहेत, अशी गुप्त माहिती अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यावर साहाय्यक आयुक्त पाटील यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून तोडकाम पथक घेऊन बुधवारी अचानक वासुंद्री रस्ता येथे धाव घेतली. तेथे चाळींची उभारणी करण्यासाठी बांधलेली ६० हून जोत्यांची बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकली. याठिकाणचे मातीचे भराव जमिनीवर पसरविण्यात आले. वासुंद्री भागात वनराईची कत्तल करून भूमाफियांनी ही जोत्यांची बांधकामे केली असल्याचे तोडकाम पथकाच्या निदर्शनास आले. या बांंधकामांना चोरीचे पाणी वापरले जात होते. या भागात पुन्हा बेकायदा चाळींची बांधकामे होणार नाहीत अशा पध्दतीने ही जोत्यांची बांधकामे नष्ट करण्यात आली.

गेल्या महिनाभरात साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी टिटवाळा परिसरातील एक हजाराहून अधिक बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, जोत्यांची बांधकामे जमीदोस्त केली आहेत. गेल्या पंचविस वर्षात प्रथमच टिटवाळा परिसरात बेकायदा बांधकामांविरुध्द ही तोडकामाची आक्रमक मोहीम सुरू आहे. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी या बेकायदा बांधकामांना अभय देण्याचे काम केले. त्यामुळे ही बेकायदा बांधकामे उभी राहिली असे तक्रारदार सांगतात. आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून ही कारवाई सुरू असल्याने कोणीही राजकीय नेता, स्थानिक पदाधिकारी ही कारवाई रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना संपर्क करत नाही. कारवाई करताना साहाय्यक आयुक्त पाटील हे मोबाईल बंद करून ठेवतात. त्यामुळे कारवाई विनाअडथळा करता येते, असे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले.

या कारवाईत अडथळा आणून गुन्हा दाखल झाला तर पुन्हा पालिका निवडणूक लढविता येणार नाही. आपले नाव काळ्या यादीत जाईल, अशी भीती राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाटते. बेकायदा चाळी उभारणारे बहुतांशी राजकीय मंडळी असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.टिटवाळा अ प्रभाग हद्दीत बेकायदा बांधकामे करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बांधकामे तोडल्यानंतरही बांधकामधारकांची नावे खात्रीलायक समजली तर त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत. तसे पाच गुन्हे टिटवाळा पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. प्रमोद पाटील साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.

Story img Loader