नव्या प्रभागरचनेमुळे अनेकांचे भवितव्य पणाला; जुन्या प्रभागांची मोडतोड
मीरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली, त्याशिवाय प्रभाग रचना प्रत्यक्षात कशी आहे याची माहितीदेखील या वेळी नागरिकांना देण्यात आली. यंदा चार सदस्यांचा एक अशी प्रभाग रचना असल्याने प्रभागांची मोठय़ा प्रमाणावर मोडतोड करण्यात आली आहे. परिणामी, अनेक मातब्बर नगरसेवकांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे. अनेक जुने प्रभाग कमी झाले असून काही नवे प्रभाग तयार झाले आहेत.
चार सदस्यांचा एक प्रभाग असल्याने प्रत्येक प्रभागात किमान एक जागा सर्वसाधारण गटातील उमेदारांसाठी उपलब्ध असली तरी नव्या रचनेत प्रभागांची झालेली मोडतोड तसेच काही ठिकाणच्या प्रभागांची कमी झालेली संख्या यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भाईंदर पश्चिम भागात सद्य:स्थितीत २८ नगरसेवक आहेत, मात्र नव्या प्रभाग रचनेत इथल्या नगरसेवकांची संख्या २३ झाली आहे. भाईंदर पूर्व भागात सध्या ३० नगरसेवक असून याठिकाणीही नगरसेवकांची संख्या कमी होऊन ती २४ वर आली आहे. त्यामुळे या भागातील अनेक विद्यमान नगरसेवकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यातच याठिकाणी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्यादेखील सर्वाधिक असल्याने कोणाची उमेदवारी कापली जाते आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.
सर्वाधिक जागा मीरा रोडमध्ये वाढल्या आहेत. भाईंदर पूर्व भागातील गोल्डन नेस्ट ते हटकेश या परिसरासाठी आता केवळ दोनच नगरसेवक आहेत. मात्र आता याठिकाणी झालेल्या नगरसेवकांची संख्या १२ झाली आहे. दुसरीकडे पेणकार पाडा ते नयानगर या भागात सध्या २८ नगरसेवक आहेत, त्याठिकाणी आता ३२ नगरसेवक झाले आहेत.
नागरिकांसाठी प्रभाग रचना उपलब्ध
जाहीर झालेल्या प्रभाग रचना ४ मेपासून महापालिकेच्या मुख्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, महापालिकेच्या संकेतस्थळावरही ती पाहता येणार आहे. या प्रभाग रचनेवर हरकती नोंदविण्यासाठी ४ मे ते १६ मे असा कालावधी देण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन १३ जून रोजी प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दिली.
महिलांसाठी ४८ जागा राखीव
* ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी महापालिकेने चार सदस्यांचा एक अशी प्रभाग रचना केली आहे. महापालिकेच्या एकंदर ९५ सदस्यांसाठी २४ प्रभाग असून उत्तनमधील एका प्रभागात तीन नगरसेवक असणार आहेत.
* अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी एक आणि इतर मागासवर्गीयांसाठी २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
* ९५ जागांपैकी ४८ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकमेव असलेली जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
* लोकसंख्येनुसार चार सदस्यांचा एक प्रभाग किमान ३० हजार आणि कमाल ३७ हजार एवढय़ा लोकसंख्येचा तयार करण्यात आला आहे.
* केवळ उत्तन आणि आसपासच्या गावांसाठी मिळून तीन सदस्यांचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे.