कल्याण : कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिकेच्या जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील पथक प्रमुख भगवान पाटील फेरीवाल्यांची पाठराखण करण्यासाठी एका व्यक्तिकडून जे प्रभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पैसे स्वीकारत असल्याची दृश्यध्वनी चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या दृश्यध्वनी चित्रफितीची पालिकेच्या वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे.

कल्याण पूर्व भागात पालिकेच्या जे प्रभागात भगवान पाटील हे फेरीवाला हटाव पथकात पथक प्रमुख म्हणून काम करतात. कल्याण पूर्व जे प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांना हटविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु, पथक प्रमुख भगवान पाटील हे दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये जे प्रभागाच्या कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर उभे राहून दुचाकीवरून आलेल्या व्यक्तिकडून फेरीवाल्यांची पाठराखण करणे आणि जे फेरीवाले पैसे देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करणे या कामासाठी पैसे स्वीकारत असल्याचे दिसत आहे. जे फेरीवाले पैसे देत नाहीत त्यामुळे हप्ता कमी पडत असल्याने आपण दिलेल्या रकमेत पंधराशे रूपये टाकले आहेत, असे पैसे देणारी व्यक्ति बोलत असल्याचे दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये दिसत आहे.

ही दृश्यध्वनी चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित होताच आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी माध्यमांना सांगितले, दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये जे प्रभागातील कर्मचारी भगवान पाटील हे काही आक्षेपार्ह गोष्टी करत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणी भगवान पाटील यांच्याकडून खुलासा मागविण्यात येईल. खुलाशातील त्यांचे मत पाहून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

भगवान पाटील हे यापूर्वी डोंबिवलीतील फ प्रभागात फेरीवाला हटाव पथकात कार्यरत होते. त्यावेळीही त्यांच्यावर फेरीवाल्यांच्या पाठराखण करण्याविषयीच्या अनेक तक्रारी पालिकेत येत होत्या. जे प्रभागात कार्यरत असताना फेरीवाल्यांच्या विषयावरून एक ते दोन वेळा अडचणीत येण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला होता, पण त्यातून ते कारवाईच्या कचाट्यातून थोडक्यात बचावले होते, असे काही वरिष्ठ पालिका अधिकारीच सांगतात.

काही माजी वजनदार नगरसेवकांचे आपण खास आहोत, असे सांगून ते प्रभागात वावरत असतात. यापूर्वी काही साहाय्यक आयुक्त भगवान पाटील यांना आपल्या प्रभागात फेरीवाला हटाव पथकात पाठवा म्हणून नेहमीच वरिष्ठांकडे रदबदली करण्यासाठी धडपडत असत, अशीही चर्चा पालिका मुख्यालयात आहे. भगवान पाटील यांच्या यापूर्वीच्या आणि आता ते एका दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये पैसे स्वीकारताना आढळून आल्याने आयुक्तांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.