जैवविविधतेने बहरलेल्या आपल्या देशाचं स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षण वाटावं असं उबदार हवामान तर आहेच, पण इतरही अनेक गोष्टी आहेत. खरं तर या पक्ष्यांना फार काही लागत नाही. पोटभर अन्न, पाणी, झोपण्यासाठी-निवाऱ्यासाठी झाडं, विश्रांतीसाठी शांतता. कोणीही उडवणार नाही, जागेवरून उठवणार नाही अशी जागा. पक्ष्यांच्या विविधतेप्रमाणे ही जागासुद्धा वेगळी. ती जागा, तो अधिवास ज्याच्या-त्याच्या शरीररचनेप्रमाणे वेगळा, प्रकृतीप्रमाणे- सवयीप्रमाणे निराळा. टिटवी, धाविक, चंडोल यांना लागणारं माळरान, तर सी-गल सूरय, बदक यांना हवं असणारं पाणी, रोझी स्टारलिंग, बुलबुल यांना गरज भासते फळावर आलेल्या खाजणाची. भारतात पक्ष्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे अधिवास मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. नदीकिनारे, पाणवठे, समुद्र, खाडय़ा, खाजण, माळरान, गवताळ प्रदेश. काय नाही इथं? म्हणून तर विविध प्रकारचे पक्षी इथं स्थलांतर करून येतात.
पाण्यातील पक्ष्यांसाठी एक वेगळी परिसंस्था इथं तयार झालेली असते. पाण्यात आणि पाण्याबाहेर गांडूळ, खेकडे, शंख-शिंपले, गोगलगाई, कालवं, शेवाळ, सापसुरळ्या, विंचू असा समतोल आहार पाणपक्ष्यांना उपलब्ध झालेला आहे. निरनिराळ्या पाणपक्ष्यांच्या पायांच्या, मानेच्या, चोचीच्या उंचीप्रमाणे आणि लांबीप्रमाणे सहज हाती लागेल असं खाद्य उपलब्ध करून देणारे पाण्याचे साठे आहेत. म्हणून तर लाखोंच्या संख्येने पक्षी येतात.
स्थलांतराला सुरुवात झाली की पहिला पाहुणा पक्षी पाण्यात उतरतो तो ‘चांदवा’. हा चांदवा म्हणजेच नामा, वारकरी किंवा कूट. अशी अनेक नावं असणाऱ्या पक्ष्याचं वैशिष्टय़ त्याच्या पायाच्या बोटांमध्ये आहे. बदकासारख्या दिसणाऱ्या या पक्ष्याच्या पायाच्या दोन बोटांमध्ये पडदे नसतात, तर जाड कातडीची झालर असते. त्यामुळे त्याला पाण्यावरून पळता येतं. या काळ्या बदकाची मान आणि डोकं जरा जास्तीच काळं असतं. त्यावर लाल डोळा, त्यात पुन्हा काळं बुब्बुळ. पण हा लाल डोळा त्या काळ्या रंगामध्ये फारसा उठून दिसत नाही. उठून दिसते ती पांढरी शुभ्र चोच आणि पांढऱ्या चोचीतून कपाळापर्यंत ओढला गेलेला पांढरा ‘नाम’ किंवा टिळा. या पांढऱ्या टिळ्यामुळेच त्याला नामा किंवा वारकरी किंवा चांदवा म्हणतात. टिळ्यासकट आपल्याला तो दिसतो. मग उत्साहाच्या भरात दुसऱ्याला दाखवायला जावं तर त्याने पाण्यात पटकन बुडी घेतलेली असते आणि तो गायब झालेला असतो. जिथं त्याने बुडी मारली तिथं नजर ठेवून आपण बसून राहतो तर दुसऱ्याच जागी टिळा दाखवत डोकं वर काढतो आणि आपल्यालाच हुलकावणी देतो.
बिनशेपटीचा हा वारकरी पोहत आहे असं अजिबात वाटत नाही. पण अंतर मात्र झपाझप कापत इकडचा तिकडे गेलेला असतो. कायम पाण्यात राहणाऱ्या या पक्ष्याच्या निरीक्षणाचा खरा आनंद मिळतो तो त्याला उडण्यापूर्वी पाण्यावर पळताना पाहताना. विमान जसं धावपट्टीवर आधी धावतं आणि मग उड्डाण करतं तसं हा पाण्यावर आधी आठ-दहा पावलं धावत जातो आणि मग उडतो. नेहमी पाण्याखाली पाय असणाऱ्या या पक्ष्याची पूर्ण उंची तो असा पाण्यावर पळत असताना दिसते. अचानक पाण्याच्या वर आलेला हा पक्षी, पाण्यावर धावणारी त्याची पावलं, त्यातून वर उडालेले तुषार, त्यातून तयार झालेली पाण्यावरची रेघ, उड्डाणाच्या आधी दिलेल्या पायाच्या रेटय़ामुळे पाण्यात पडलेला खळगा आणि मागच्या बाजूला उडालेले पाण्याचे मोठमोठे थेंब. त्याच वेळी हवेत झेप घेऊन उडून एखाद्या झुडपात शिरलेला वारकरी पाहायला आणि कॅमेऱ्यात टिपायला मिळाला तर आणखी काय हवं! पश्चिम आशियातून २५०० कि.मी. अंतराचा लांब पल्ला कापून येणारा चांदवा न थांबता २५० कि.मी.चा प्रवास करतो. पूर्वी एकाच पाणवठय़ावर एका वेळी चार-पाचशे चांदव्यांचा थवा चमकत असायचा. पण सध्या ती संख्या रोडावून अगदी चाळीस-पन्नासवर आली आहे. पाण्यामध्ये वाढलेल्या हायसिंथ (जलपर्णी) किंवा पिस्टिया या पाणवनस्पतींमुळे तर हे नसेल ना? पाण्यावर धावताना या पाणवनस्पतींमुळे त्याला अडथळ्यांची शर्यत तर पार पाडावी लागत नसेल ना? या चांदव्याच्या
दरवर्षी येण्याला ग्रहण लागणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी.
मेधा कारखानीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा