डोंबिवली – डोंबिवली पश्चिम येथे महानगर गॅस कंपनीतर्फे गॅसपुरवठा सुरू करण्यास विलंब होत आहे. बहुतांशी इमारतींमध्ये गॅस पुरवठा वाहिका टाकून दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. अद्याप नागरिकांना गॅस पुरवठा सुरू झालेला नाही यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नागरिकांच्या मागणीवरून महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांसोबत डोंबिवली पश्चिम येथे टाकण्यात आलेल्या गॅसवाहीकांची जिल्हाप्रमुख म्हात्रे आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केली. महानगर गॅसने तातडीने उपाययोजना करून पुढील दोन महिन्यांत गॅसपुरवठा सुरू करावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेत स्थायी समिती सभापती असताना पंडित दीनदयाल रोड व महात्मा गांधी रोड या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटची कामे सुरू होती. त्यावेळी दूरदृष्टी ठेवून आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी महानगर गॅसची पुरवठा वाहिनी टाकण्यासाठी नियोजन करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे वाहिन्या टाकण्यासाठी नियोजन केले. त्यानंतर या भागात गॅस वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र, दीड वर्षांपासून नागरिकांना गॅस न मिळणे ही गंभीर बाब आहे, असे जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
यावेळी डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महानगर गॅसने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेनेच्या पुढाकाराने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी दिला आहे.