कल्याण – आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे महायुतीला धक्का लागणार नाही, अशी कोणतीही कृती कोणत्याही शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्याने करायची नाही. शिवसेनेच्या डोंबिवली विभागातील सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी महायुतीकडून जो उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दिला जाईल, त्याच्यासाठीच जोमाने काम करायचे आहे, असा सल्ला कल्याण लोकसभेचे शिवसेना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकारी, नेत्यांना दिला. डोंबिवलीत शिंदे गटातून बंडखोरी करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून किंवा अपक्ष म्हणून भाजप उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या एका युवा नेत्याला आम्ही तुमच्या पाठीशी नाहीत, असा इशारा यानिमित्ताने खासदारांनी दिला.
गेल्या महिन्यापासून डोंबिवलीत खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा खास समर्थक म्हणून ओळखला जाणारा एक युवा नेता विविध पक्षातील आपल्या ज्ञातीमधील १२ हून अधिक नगरसेवक घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा होती. तसे वातावरण या युवा नेत्याने तयार करण्यास सुरुवात केली होती. गणेशोत्सव काळात या युवा नेत्याने आगरी समाजासह डोंबिवलीतील विविध ज्ञातीमधील ज्येष्ठांच्या भेटी घेऊन आपण आगामी विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत देण्यास सुरूवात केली होती. वर्षानुवर्षाचा वैरभाव विसरून या युवा नेत्याने गणेशोत्सवाचे निमित्त करून शत्रूंच्या घरात प्रवेश केला होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आपण हे सगळे खासदार डाॅ. शिंदे यांच्या आशीर्वादाने करत असल्याची मल्लीनाथी हा युवा नेता करत होता. स्थानिक शिवसैनिक चक्रावून गेले होते. या युवा नेत्याच्या या हालचालींची ज्येष्ठ शिवसैनिक बालीशपणा, पोरखेळ अशी संभवना करत होते. डोंबिवलीतील हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना माहीत नव्हता.
हेही वाचा – डोंबिवलीत निळजे लोढा हेवनमधील फेरीवाल्यांना नागरिकांनी हटवले
खड्डे फलक भोवले
गेल्या महिन्यात गोकुळ अष्टमीनिमित्त आपण शहरात फलक लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती. भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना डिवचण्यासाठी या हालचाली सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शुक्रवारी वाढदिवस असताना त्याच्या आदल्या मध्यरात्री त्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक डोंबिवलीत लावण्यात आले. फलक छपाईदाराने युवा नेत्याच्या इशाऱ्यावरून आपण हे केल्याचे पोलिसांना सांगितले. या विषयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाखडी झाली.
युवा नेता बाहेर
डोंबिवली परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खा. डाॅ. शिंदे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी दोन दिवस बैठका घेतल्या. त्या युवा नेत्याने बंडखोरी केली तर त्याच्या सोबत कोण जाईल, अशी चाचपणी केली. त्यांच्या बंडखोरीचा विचार न करता शिवसैनिकांनी महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करायचा आहे, असे स्पष्ट केले. शिवसेना पदाधिकारी बैठकीत असताना युवा नेता स्वत:हून वर्षा निवासस्थानाबाहेर त्याच्या वाहनात बराच उशीर डाॅ. शिंदे यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता.
डोंबिवलीतून शिवसेनेतून काही जण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर अशा कोणत्याही प्रवृत्तीला थारा न देता शिवसैनिकांनी महायुतीच्या उमेदवाराचे जोमाने काम करायचे आहे. कोणत्याही ऐकीव, दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याच्या खासदार डाॅ. शिंदे यांनी डोंबिवलीतील शिवसैनिकांना सूचना केल्या आहेत. – राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख, डोंबिवली.