बदलापूरः ज्या उल्हास नदीवर जिल्ह्यातील लाखो नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत, त्या उल्हास नदीचे पाणी दूषित करण्यात काही नागरिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात थेट वाहने नेऊन धुलाई केली जात आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा झाले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून ठाणे जिल्ह्यातल्या शहरांमधून वाहणारी उल्हास नदी जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाचा स्रोत आहे. बारवी धरणातून सोडलेले पाणी बारवी नदीच्या माध्यमातून उल्हास नदीला मिळते. त्याआधी उल्हास नदीवर बदलापुरात बॅरेज बंधारा आहे. शिवाय, आपटी आणि शहाड येथेही उल्हास नदीवर बंधारे आहेत. त्यामुळे जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी उल्हास नदी महत्त्वाची आहे. पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या उल्हास नदीला प्रदूषणापासून रोखण्याची जबाबदारी प्रशासन आणि नागरिकांची आहे. पंरतु या दोघांकडून नदीच्या प्रदूषणात दररोज भर घातली जात आहे. शहरांमधून निघणारे सांडपाणी थेट नदीत मिसळते आहे. त्यात बदलापूरसारख्या शहरात नदी पात्रात निर्माल्य, कचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जात आहे. गणेशोत्सवासाठी थेट नदीपात्रापर्यंत चांगली वाट तयार करण्यात आली होती. त्याच वाटेचा वापर करत आता वाहनचालक थेट नदी पात्रात वाहने घेऊन जात असून त्यात वाहनांची धुलाई सुरू आहे. रिक्षा, दुचाकी आणि सायकलही नदी पात्रात नेऊन धुतल्या जात आहेत. या धुलाईमुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा – मोटारीने पेट घेतल्याने पातलीपाडा ते कोपरी रेल्वे पूलापर्यंत वाहनांच्या रांगा
हेही वाचा – आता मुरबाडपर्यंत गोदामांच्या रांग; भिवंडीचे व्यापार केंद्र विस्तारण्याच्या हालचाली
निर्माल्य आणि कचऱ्याची भर
गणेशोत्सवात विसर्जनासाठी उल्हास नदी पात्र आणि येथे शेजारी उभारण्यात येत असलेल्या कृत्रिम तलावात शेकडो नागरिक येत असतात. काहीजण नदी पात्रात विसर्जन करतात तर काही कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करतात. या विसर्जनानंतर नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य आणि कचरा टाकला गेला. त्यामुळे प्रदूषणात भर पडली आहे.