अंबरनाथः गेल्या वर्षात अंबरनाथ नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे चिखलोली भागातील कचराभूमीचे सांडपाणी थेट नागरिकांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये आणि शेजारच्या जांभूळ गावातील शेतांमध्ये शिरत होते. त्यावर दिलासा देण्यासाठी पालिकेने नुकतेच गटार बांधले. मात्र हे गटार चक्क ग्रामपंचायतीच्या हद्दीत घुसखोरी करून बांधल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला आहे. तर हे सांडपाणी पुन्हा गावात शिरण्याची भीती आहे. पालिकेने यासाठी कोणतीही पूर्वसूचना, परवानगी घेतली नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला असून पालिकेच्या या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
अंबरनाथसह बदलापूर आणि उल्हासनगर शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्याची निविदाही जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी अंबरनाथ शहरातील कचराभूमीचा प्रश्न गेल्या काही वर्षांत गंभीर झाला होता. अंबरनाथ नगरपालिकेने स्थलांतरीत केलेली चिखलोली येथील कचराभूमी अपुऱ्या नियोजनामुळे वादात सापडली होती. कचराभूमीतील कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने दुर्गंधी पसरली होती. पावसाच्या पाण्याने यातील दुर्गंधीयुक्त काळसर सांडपाणी जमिनीत मुरून रहिवाशांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये झिरपले होते. तर हेच सांडपाणी वाहून पुढे शेजारील जांभूळ ग्रामपंचायत हद्दीतील शेतांमध्ये जाऊन शेती नापीक करत होते. याविरुद्ध स्थानिक आणि ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर पालिकेने येथे गटार बांधण्याचा निर्णय घेतला. कचराभूमीचा प्रश्न राष्ट्रीय हरित लवादात गेल्यानंतर स्थानिक प्रशासनाला लवादाने सूचना केल्या होत्या. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेने येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार बांधले. मात्र आता हे बांधकाम वादात सापडले आहे.
हेही वाचा – अंबरनाथमध्ये महिलेची हत्या करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना जन्मठेप
आपल्या नगरपालिकेचे क्षेत्र सोडून अंबरनाथ नगरपालिकेने जांभूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत घुसखोरी करून गटार बांधल्याचा आरोप सरपंच परिक्षित पिसाळ यांनी केला आहे. पालिकेच्या कचराभूमीचा त्रास आम्हाला गेल्या वर्षभरापासून होतो आहे. या कचराभूमीकडे जाणारा रस्ताही ग्रामपंचायत हद्दीत आहे. आम्ही पालिकेला सहकार्य करतो. मात्र त्यानंतरही पालिकेने कोणतीही पूर्वसूचना, परवानगी न घेता थेट ग्रामपंचायत हद्दीत गटार बांधले आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचेही पिसाळ यांनी सांगितले आहे. तसेच हे सांडपाणी पुन्हा गावात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा पुन्हा गावाला त्रास होण्याची भीतीही पिसाळ यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे पिसाळ यांनी सांगितले आहे.
पाणी प्रक्रिया केंद्रातच सोडणार
कचराभूमीतून निघणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेण्याला सुरुवातीला काही नागरिकांनी विरोध केला. मात्र त्यावर प्रक्रिया करण्याचा मानस आहे. त्यामुळे हे सांडपाणी प्रक्रिया केंद्रातच नेले जाईल, अशी माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. जांभूळ ग्रामस्थांची तक्रार रास्त आहे. पण त्यांना त्रास होणार नाही यासाठी व्यवस्थापन केले जात असल्याचेही रसाळ यांनी सांगितले आहे.