‘हिंदुस्थान मोनोमर्स’चा पाणी बचतीचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी
डोंबिवली एमआयडीसीतील अनेक कंपन्यांचे सांडपाणी नाली, तलाव, नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्यावर परिणाम होत आहे. परंतु या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केल्यास निर्माण होणारी समस्या सुटू शकते याचा विचारच गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चिला जात आहे. परंतु या विचारावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे धाडसी पाऊल येथील हिंदुस्थान मोनोमर्स प्रा.लि.कंपनीने उचलले आहे. कंपनीने ‘शून्य सांडपाणी’ (झिरो डिसचार्ज) प्रक्रियेचा अवलंब सुरू करुन इतर कंपन्यासाठी आपला आदर्श निर्माण केला आहे.
कंपनीने पाणी बचतीचा एक अनोखा पथदर्शी प्रकल्प यशस्वी केला आहे. कंपनीत उत्पादन प्रक्रिया होत असताना तयार होणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर करून त्या माध्यमातून नव्याने उत्पादन केले जात आहे. उत्पादन प्रक्रियेनंतर कंपनीतून सांडपाण्याचा एक थेंब बाहेर जाणार नाही, अशी व्यवस्था करून ‘शून्य सांडपाणी’ (झिरो डिसचार्ज) प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. स्वखर्चातून, अनेक अडथळ्यांवर मात करीत ‘हिंदुस्थान मोनोमर्स’ कंपनीचे संचालक हेमंत बांदोडकर, कंपनीतील संशोधन अधिकारी दिलीप सावंत यांनी हा ‘शून्य सांडपाणी’ प्रक्रिया प्रकल्प आकारला आहे.
दिवसाला दोन लाख लिटर पाणीसाठा
कच्च्या मालासारखा पाण्याचा वापर आणि अधिकाधिक सांडपाण्याचा उत्पादन प्रक्रियेसाठी पुनर्वापर करायचा, असे सूत्र या प्रकल्पासाठी ठरविण्यात आले आहे. जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी कंपनीच्या आवारात लाखो लिटर पाणीसाठा करतील अशा चोहोबाजूने टाक्या बसविण्यात आल्या आहेत. दिवसाला दोन लाख लिटर पाणीसाठा या टाक्या करतात. कंपनीच्या छतावरून पडणारे पाणी पन्हळीच्या माध्यमातून टाक्यांमध्ये जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रकल्पाला अमेरिकन ‘पेटंट’
कंपनीतील जे उत्पादन ८० टनांपर्यंत होते, ते ५० टनांपर्यंत घटले. माल वेळेवर बाहेर न आल्याने खरेदीदारांनी सुरुवातीला कुरबुर केली. मात्र, त्यांना कंपनी पर्यावरण संवर्धन, पाणी बचतीसाठी करीत असलेल्या विधायक प्रकल्पाची माहिती दिल्यावर आवश्यक ते सहकार्य खरेदीदार कंपन्यांनी केले. या पथदर्शी प्रकल्पाला अमेरिकन ‘पेटंट’ मिळाले आहे. अधिकाधिक रहिवासी, उद्योजकांनी हा प्रकल्प राबवावा यासाठी आमचे सहकार्य असेल, असे बांदोडकर यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डी. बी. पाटील, अमर दुडगुले, एमआयडीसीचे एस. आर. पाटील यांनी सहकार्य केले. कंपनीतून बाहेर सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे सर्व प्रवाह बंद करण्यात आले आहेत. सांडपाण्याचा प्रत्येक थेंब कंपनीत साठविला जातो. या सांडपाण्याची शुद्ध, अशुद्ध, अतिअशुद्ध अशी क्रमवारी करून त्यावर पुनर्वापरासाठी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जाते. या अशुद्ध पाण्यातील जे घटक अक्रिय (इनर्ट) आहेत, त्यांच्यावर प्रक्रिया करून तो चोथा बाहेर विकण्यात येतो.
स्वच्छ पाणी वापरावर निर्बंध
एक किलो उत्पादन प्रक्रियेला साधारणपणे १०० टक्के स्वच्छ पाणी वापरले जाते. तेवढय़ाच उत्पादन प्रक्रियेसाठी हिंदुस्थान मोनोमर्समध्ये सांडपाण्याचा पुनर्वापर करून ७४ टक्के स्वच्छ पाण्याचा वापर कमी करण्यात आला आहे. स्वच्छ पाण्याच्या वापरावर र्निबध आणि सांडपाण्याच्या सर्वाधिक पुनर्वापर करण्यात येत असल्याने स्वच्छ पाण्याचा मुबलक साठा कंपनी आवारात असतो. येणाऱ्या काळात पावसाळ्याच्या चार महिन्यांत कंपनीतील उत्पादन पावसाच्या पाण्यावर घ्यायचे. या काळात एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यायचे नाही, असा विचार सुरू आहे. कंपनी आवारात सौर ऊर्जेवरील पाणी गरम करण्याची सयंत्रणा, सौर ऊर्जेवरील दिवे बसविण्याची कामे करून नैसर्गिक स्रोतांवर चालणारी कंपनी असा आकार देण्याचा प्रयत्न सुरू आहे.