ठाणे – ठाणे पोलिसांकडून जिल्ह्यात अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपायोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आता अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची प्रत्येक महिन्यात विशेष गटामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. तर वारंवार एकाच पत्त्यावरून येणाऱ्या, तसेच परदेशातून येणाऱ्या टपालावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. याबाबत नुकतीच जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या समितीचे अध्यक्ष तथा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात अमली पदार्थांचा वापर आणि रोखण्यासाठी पोलिसांकडून शहरी, तसेच ग्रामीण भागात अनेक उपायोजना राबविण्यात येत आहेत. तर या सर्व अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मागील वर्षभरात अनेक कारवायाही करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या वर्षभरात आयुक्तालय हद्दीत विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे २ कोटी ७२ लाख ४८ हजार २३३ रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. तर या मोहिमेत एकूण ६८८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. यामध्ये गांजा, चरस, कोकेन, मेफेड्रॉन, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नशेच्या गोळ्या, कफ सिरफ, हेरॉईन, अफिम, केटामाइन आणि मॅथेक्युलिन यांसारख्या अमली पदार्थांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागातील अमली पदार्थांचा वापर आणि विक्री रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची नियमित स्वरुपात विशेष गटामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच वारंवार एकाच पत्त्यावरून येणाऱ्या, तसेच परदेशातून येणाऱ्या टपालावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
याबाबत नुकतीच जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष तथा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहे. याबरोबरच जिल्ह्यात अमली पदार्थाविषयी जनजागृती करण्याबरोबरच ग्रामीण भागातील भिवंडी येथील गोदामांची पोलिसांच्या मदतीने तपासणी करण्याच्या, तसेच बंद असलेल्या एमआयडीसीमधील कंपन्यांची माहिती गोळा करण्याच्या सूचनाही देशमाने यांनी यावेळी अधिकारी वर्गाला दिल्या आहेत. या बैठकीला समितीचे सदस्य तथा अतिरिक्त आयुक्त राहुल कुमार, राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक चारुदत्त हांडे, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त राजेश चौधरी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधीक्षक अमोल मोरे, टपाल विभागाच्या अधीक्षक अस्मिता सिंग, जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप उपस्थित होते.