मंदिरात गाऊन घालून प्रवेश करणाऱ्या महिला पोलिसाला जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मारहाण करणाऱ्या महिला पोलिसाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेत तिसगाव भागात तिसाई मंदिर असून या मंदिरात मंगळवारी संध्याकाळी प्रतीक्षा लाकडे या दर्शनासाठी आल्या होत्या. प्रतीक्षा लाकडे या पोलीस उपनिरीक्षकपदावर कार्यरत आहेत. प्रतीक्षा लाकडे यांनी गाऊन घातला होता. तिसाई मंदिरात महिला भाविकांनी गाऊन घालून प्रवेश करु नये, असा नियम काही दिवसांपूर्वीच लागू करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक रहिवासी आशा गायकवाड यांनी लाकडे यांना विरोध दर्शवला. मात्र यामुळे लाकडे संतापल्या. त्यांनी आशा गायकवाड यांना बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेवरुन संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रार करण्यात आली आहे. लाकडे यांनी लाथाबुक्क्यांनी महिलेला मारहाण केली, मात्र तरीदेखील अदखलपात्र गुन्हा दाखल करुन पोलिसांनी लाकडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नियम चुकीचा पण मारहाण करणे योग्य आहे का ?
मंदिरात गाऊन घालून येणाऱ्या महिला भाविकांना प्रवेश नाकारणे हा नियम चुकीचा आहे. मात्र याविरोधात प्रतीक्षा लाकडे यांना कायदेशीर मार्गाने लढा देता आला असता, त्या स्वतः पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरला असता. मात्र यावरुन थेट हिंसक मार्गाचा अवलंब करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया कल्याणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

Story img Loader