सध्या आपल्या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट आहे. मराठवाडा तर अक्षरश: होरपळून निघत आहे. सोलापूरमध्ये चार-पाच दिवसांतून एकदा पाणी येते, तर जालनामध्ये १०-१२ दिवसांतून एकदा पाणी येते. लातूरमध्ये तर नळाने येणारे पाणी गेले दोन महिने पूर्ण बंद आहे. या भागातील शेतकरी आणि सामान्य लोक (सधन वर्ग सोडून) यांच्या आयुष्याची भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळ यामुळे अक्षरश: परवड झाली आहे. या पाश्र्वभूमीवर इतर शहरांतील लोकांचे जीवन खरोखरच सुखकारक म्हणावे लागेल.
आपल्यासारख्या शहरवासीयांना नळ उघडल्यावर सहज पाणी मिळत असल्याने त्याचे मोल जाणवत नाही. डोक्यावर हंडा, कंबरेवर कळशी, हातात बादली घेऊन जेव्हा काही मैल वणवण करीत जावे लागते तेव्हा प्रत्येक थेंबाची महती जाणवते. त्यामुळे आपण ब्रश करताना, दाढी करताना, अगदी चूळ भरतानादेखील नळ बिनधास्त चालू ठेवून काम करीत राहतो. या वर्षीच्या उन्हाळ्याने/ पाणीटंचाईने शहरवासीयांना थोडी झळ पोहोचल्याने आपण थोडा विचार करू लागलो आहोत(?). अजून युद्धपातळीवरील प्रयत्न तुलनेने (काही अपवाद सोडल्यास) खूपच कमी आहेत. मोठय़ा व्यक्तींच्या सवयी बदलणे इतके सोपे नसते, पण लहान मुलांवर जर चांगल्या विचारांचे संस्कार केले, त्यांना या गोष्टी योग्य रीतीने समजावून दिल्या, तर त्या पटतात. त्या दृष्टीने विचार करू पाहतात आणि तसे वागायचा प्रयत्नही करतात. हे अशा तऱ्हेचे आचारविचारांचे संस्कार कायमस्वरूपी असतात. महाराष्ट्र शासनातर्फे १६ ते २२ मार्च हा आठवडा जलसाक्षरता अभियान सप्ताह म्हणून घोषित करण्यात आला होता. विविध शाळांमधून या दृष्टीने अनेकविध उपक्रम राबविण्यात आले आणि विद्यार्थ्यांना पाणी आणि पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी जलप्रतिज्ञा तयार करण्यात आली आहे आणि ती शाळा-शाळांमधून घेतली जाते. जागतिक जल दिनाचे औचित्य साधून समाजात पाणीबचतीचे महत्त्व पटवून विविध शाळांनी ठाण्यात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती फेऱ्यांचे आयोजन केले होते. ‘जल है तो कल है’, ‘पाणी म्हणजे जीवन’, ‘पाणी वाचवा, अपव्यय टाळा’ इत्यादी संदेश देणारे फलक हातात घेऊन घोषणा देत या फेऱ्या काढण्यात आल्या होत्या. धूलिवंदनाच्या पाश्र्वभूमीवर कोरडी होळी खेळून पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
ठाण्यातील श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सातत्याने वैशिष्टय़पूर्ण उपक्रम त्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने राबविले जातात. भारतीय संस्कृतीची ओळख करून देताना आधुनिक काळानुसार वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक सण-उत्सव आणि जयंती साजरा करताना आवर्जून अवलंबिला जातो. कोणताही महत्त्वाचा दिवस हा सर्वागाने साजरा करण्याच्या दृष्टीने आखणी केली जाते. त्या दिवसाच्या अंगाने मोडय़ूल तयार करून माहिती देणारे फलक, कटआऊट्स, चित्रे, विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग अशा दृष्टीने विषयाचा वेध घेतला जातो. पाणीबचत सप्ताह शाळेत करताना एज्युकॉम सिस्टीमच्या साहाय्याने महाराष्ट्रातील दुष्काळाची सचित्र माहिती आठवडाभर विद्यार्थ्यांना देण्यात आली, चर्चा करण्यात आली. इयत्ता पाचवी ते आठवीसाठी चित्रकला स्पर्धा, तर नववीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. होळीच्या प्रतिकृतीमध्ये गवताची होळी (पारंपरिक), कोरडय़ा रंगांनी खेळणाऱ्या मुलांची कटआऊट्स, बाजूला मुलांनी काढलेली चित्रे, पाणीबचतीचे महत्त्व सांगणारे माहितीफलक, कोरडी होळी खेळण्याची गरज विशद करणारा फलक इत्यादी गोष्टींचा समावेश होता. अशा तऱ्हेने विषयाचे महत्त्व बिंबविले जाते.
सेठ टी. जे. हायस्कूल या गुजराती माध्यमाच्या शाळेत इको क्लबच्या माध्यमातून वर्षभर अनेकविध उपक्रम राबविले जातात. आपल्या संस्कृतीने पर्यावरण जतन, संवर्धनाची शिकवण प्राचीन काळापासून कशी दिली आहे आणि काळाची निकड लक्षात घेऊन आपण काय करायला हवे ते विद्यार्थ्यांना पटवून दिले जाते. मुलांना होळीसाठी झाडे न तोडता आजूबाजूला मिळणारा भुसा, वाळलेली पाने, सुताराकडची लाकडे यांचा वापर करण्यास सांगितले गेले. कोरडी होळी का खेळणे गरजेचे आहे आणि पाणीबचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. दर महिन्याला विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जतन, संवर्धनाचे महत्त्व कळावे म्हणून एक कार्यक्रम केला जातो.
ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच संस्थेतर्फे ठाणे शहरातील १५ शाळांमध्ये (महापालिका शाळा क्र. १८, १९, २३; ज्ञानोदय विद्यालय, यशोधन मराठी विद्यालय, पद्मावती व्यंकटेश स्कूल, कळवा इत्यादी) होळीच्या पाश्र्वभूमीवर कार्यशाळा फेब्रुवारी महिन्यापासूनच घेण्यात आल्या. रासायनिक रंगांमुळे होणारे विविध प्रकारचे प्रदूषण (पाणी, त्वचा, हवा इत्यादी) टाळण्यासाठी आणि पाणीबचतीच्या दृष्टीने कार्यशाळांची आखणी करण्यात आली होती. एका विद्यार्थ्यांने तयार केलेली ‘सेव्ह वॉटर’ ही दहा मिनिटांची शॉर्ट फिल्म मुलांना खूप काही शिकवून जाते.
अनमोल विद्यालयाने म्हाडा, वसंतविहार परिसरांत जल दिनाचे औचित्य साधून पाणीबचतविषयक जनजागृतीसाठी ढोल-ताशे घेऊन प्रचार केला. विद्यार्थ्यांनी हंडा-बादलीच्या आकाराच्या फलकांवर पाणीबचतविषयक महत्त्वपूर्ण लिहिलेले संदेश लक्षवेधक होते. याच विषयावर एक पथनाटय़ही विद्यार्थ्यांनी सादर केले आणि प्रभातफेरीमध्ये संपूर्ण शाळा सहभागी झाली होती. ‘पाण्याचे स्रोत’, ‘पाण्याचे महत्त्व आणि उपयोग’, ‘पाणी प्रदूषण’, ‘जलजागृती’ इत्यादी विषयांवर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा शाळेत आयोजिण्यात आली होती. सर्व शिक्षकांनी या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अशा तऱ्हेच्या उपक्रमांच्या माध्यमातून बदलत्या काळाची निकड लक्षात घेऊन नवीन बदलांचा स्वीकार करणे सुलभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा