ठाणे : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये १०८ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचे समोर आले असतानाच, त्यापाठोपाठ आता पाणी पुरवठा विभागाने १४९ कोटी रुपयांची पाणी देयकांची वसुली केल्याने गतवर्षीपेक्षा यंदा वसुलीत १५ कोटींनी अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पाणी पुरवठा विभागाने केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळे अखेरच्या दिवशी या विभागाला सात कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले.

ठाणे महापालिकेच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये पाणी पुरवठा विभागाला पाणी देयकांपोटी १४७ कोटी रुपये तर थकबाकीपोटी ७८ कोटी रुपये असे एकूण २२५ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यावर्षी चालू पाणी देयकांच्या रकमेपोटी ९४ कोटी ५४ रुपये वसूल झाले आहेत. तर, थकबाकीपोटी ४० कोटी ४१ लाख रुपयांची वसुली झाली आहे. त्याचबरोबर, मुख्यालय येथे १४ कोटी रुपयांच्या देयकाचा भरणा झाला आहे. या आर्थिक वर्षात एकूण १४८ कोटी ९५ लाख रुपयांची वसुली झाली आहे.

पाणी पुरवठा विभागाने अधिकाधिक वसुली करून उद्दीष्टपूर्ती करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्यानुसार, सप्टेंबर-२०२४ मध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मीटर रीडरना साप्ताहिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले. तसेच, बेकायदा नळजोडण्या खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, पाणी पुरवठा विभागाचे मीटर रिडर, उपअभियंता, प्रभाग समितीतील कर्मचारी, सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांनी बेकायदा नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई हाती घेतली होती.

यामध्ये वर्षभरात १३ हजार १५६ जल जोडण्या खंडित केल्या. १३ हजार ८३७ ग्राहकांना नोटीसा दिल्या. २३७४ मोटप पंप जप्त करण्यात आले. तर, ६७६ पंप रुम सील करण्यात आले. या कारवाईनंतर ग्राहकांकडून थकीत तसेच चालू देयकांचा भारणा करण्यास सुरूवात झाली. यामुळे पालिकेच्या तिजोरीत गेल्यावर्षीपेक्षा १५ कोटी रुपयांची अधिक पाणी देयकांची वसुली करणे शक्य झाल्याचे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी सांगितले.

थकबाकी वसुलीची कारवाई सुरूच राहणार ज्या ग्राहकांकडे पाणी देयकांची थकबाकी आहे, त्याचा पुन्हा आढावा घेऊन थकबाकी वसुली केली जाणार आहे. जे ग्राहक चालू वर्षाच्या देयकासह थकबाकी भरणार नाहीत, त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई सातत्याने सुरूच राहणार असल्याचे विनोद पवार यांनी स्पष्ट केले.