अधिकारी बेफिकीर, नेते निवडणुकीत दंग; नागरिक व्याकूळ

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह आता शहरी भागातही पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून स्मार्ट सिटीच्या गप्पा मारण्यात व्यस्त असलेल्या ठाणे महापालिकेस पाणी वितरणाचे योग्य नियोजन करण्यात अपयश येत असल्याने येऊर, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट भागात गेल्या काही दिवसांपासून चक्क टॅकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली आहे. निवडणुकीच्या हंगामात वाढत चाललेल्या या पाणीटंचाईकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाले असून महापालिका प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा वाढू लागला आहे. ग्रामीण भागातील विहिरीदेखील आटल्या असून कूपनलिकांद्वारे सुयोग्य पाणीही मिळत नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येते. असे असताना पाणीटंचाईची झळ आता शहरी भागालाही बसत आहे. अधिक लोकवस्तीचा परिसर असणाऱ्या लोकमान्य नगर परिसरातील पाडा क्रमांक चार भागात महापालिकेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  बुधवारी होणारी पाणीकपात आणि त्यानंतर नळांना कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे खूप कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याचे स्थानिक महिलांकडून सांगण्यात आले. तसेच या नळांद्वारे दूषित पाणी येत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. लोकमान्य नगर परिसरात सुरु असलेली रस्ता आणि वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे यामुळे पाणी वाहून नेणाऱ्या नळवाहिन्या या जागोजागी फुटल्यामुळे त्याद्वारे दूषित पाणी येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणातील पाणीसाठय़ात १० ट्क्के तूट असली तरी गेल्या तीन महिन्यांपासून लागू असणारी प्रतिआठवडा ३० तासांची पाणीकपात ही यापुढेही कायम राहणार असल्याचे नुकतेच ठाणे लघुपाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्य़ाला १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये असून पाणीपुरवठा समतोल राखण्याचा प्रयत्न लघुपाटबंधारे विभागाकडून होत असल्याचे लघुपाटबंधारे विभागाने जाहीर केले. मात्र शहरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

येऊर आणि वागळे इस्टेट परिसरातही टंचाई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर येथील गावपाडय़ांवरही पाण्याची समस्या गेल्या आठवडय़ाभरापासून निर्माण झाली आहे. येथील पाडय़ांवर महापालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा होतो. येऊरमधील ११ पाडय़ांवरील नागरिकांच्या घराजवळ टाक्या आहेत. मात्र या टाक्या काही अवधीतच रिकाम्या होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने या गावपाडय़ांवर नागरिकांना नैसर्गिक डबक्यातील पाण्यावर गुजराण करावी लागते. येथील दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत असल्याची घटना उघडकीस आली होती. वागळे इस्टेट येथील औद्योगिक परिसरातही पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. येथील कंपन्यांना टँकर बोलावून पाणी विकत घ्यावे लागत आहे.

कमी दाबामुळे पाणी टंचाई

सद्यस्थिीत ठाणे शहरातील पाणीपुरवठा दर बुधवारी सकाळी नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. गुरुवार नंतर पाणीपुरवठा कमी दाबाने होत असून पाणी सुरळित होण्यास शनिवार उजाडत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजित अवधीपेक्षा अधिक काळ कमी दाबाने होत असल्याने पाणी समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

लोकमान्यनगर परिसरातील पाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मध्यंतरी या भागात दूषित पाणी आढळून आले होते. त्याची चाचणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात आली. या परिसरातील वाहिन्यांची दुरुस्ती झाल्यानंतर नागरिकांना सुरळीत आणि सुयोग्य पाणीपुरवठा होईल.

अतुल कुलकर्णी, उप अभियंता-पाणीपुरवठा विभाग

Story img Loader