ऐन परीक्षांच्या काळात पाणी भरण्यासाठी विद्यार्थ्यांची अभ्यासाला दांडी
पाणीटंचाईने राज्यभरातील जनतेला हैराण केले असताना पाण्याचा प्रश्न आता नवीन पिढीच्या भविष्यावरही परिणाम करू लागला आहे. घरात आंघोळीसाठीच नव्हे, तर पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने डोंबिवलीजवळील पिसवली, गोळवली, सोनारपाडा भागातील अनेक विद्यार्थी दिवसभर पाणी मिळविण्यासाठी शाळेला दांडी मारून पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. विशेष म्हणजे, पाणीप्रश्न अतिशय बिकट बनल्याने पालकांकडेही मुलांना पाणी शोधण्यासाठी पाठवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
पिसवली, गोळवली, सोनारपाडा परिसरात झोपडपट्टय़ा तसेच चाळींमधून शेकडोंच्या संख्येने कुटुंबांचे वास्तव्य आहे. या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाण्याचा पुरवठा केला जातो. झोपडपट्टी, चाळींना एमआयडीसीकडून येणाऱ्या पाण्याची एकत्रित साठवण करण्यासाठी टाकीची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे येथील रहिवासी सार्वजनिक नळावर किंवा विभागाप्रमाणे दिलेल्या जलवाहिन्यांवरून पाणी भरतात. पाणीकपात असल्याने अनेक ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त पाणी येत नाही, अशा तक्रारी आहेत. तेवढय़ा वेळेत घरातील पाणी भरून होत नाही. त्यामुळे घरात पाण्याचा ठणठणाट असतो.
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा परिसर तसेच २७ गावांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक पाणीकपात आहे. या भागाचा पाणीपुरवठा आठवडय़ातून साडेचार दिवस बंद राहतो, अशा तक्रारी आहेत. त्यानंतरच्या दिवसात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेकडून टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर रहिवाशांना अवलंबून राहावे लागत आहे.
चाळी, झोपडपट्टीतील अनेक रहिवासी कष्टकरी, मजूर संवर्गातील आहेत. घरातून पालक सकाळी कामासाठी बाहेर पडतात. घरातील मुले सकाळी उशिरा किंवा दुपारच्या वेळेत शाळेत जाणारी असतात. त्यांना पालकांकडून आजूबाजूच्या परिसरात फिरून पाणी आणण्यासाठी सांगितले जाते. त्यामुळे मुले गटागटाने परिसरात पाण्यासाठी फिरतात. पिसवली, गोळवली भागातील मुले पाणी कोठे मिळते का म्हणून मानपाडा पोलीस ठाणे, व्यंकटेश, उस्मा पेट्रोलपंप, एमआयडीसीच्या जलवाहिन्यांच्या आसपास भटकंती करताना आढळत आहेत, असे या भागात महिला बचत गटाचे काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. अभ्यासाचे दिवस आहेत. पण, घरात पाणी नसल्याने आई, बाबांकडून अभ्यास बाजूला ठेवून मुलीला पाण्यासाठी बाहेर पाठवले जाते. ‘वाचा’ या संस्थेतर्फे पिसवली, गोळवली भागातील मुली, स्त्रियांच्या उत्कर्ष, व्यक्तिमत्त्व विकासासाठी वर्ग भरवतात. या वर्गाना येणाऱ्या अनेक मुली गैरहजर राहत असल्याचे या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत मुलींना विचारणा केली असता, आम्हाला पाणी मिळविण्यासाठी फिरावे लागते, अशी उत्तरे मुलींकडून देण्यात येतात, असे या भागात मुली, स्त्रियांच्या उत्कर्षांसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यां रुपाली पेटकर यांनी सांगितले. दहावीच्या परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनाही या कामासाठी जुंपले जात असल्याचे या भागात काम करणाऱ्या काही समाजसेवी संस्थांच्या निदर्शनास आले आहे.
पाण्याच्या शोधात शाळेकडे पाठ!
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा परिसर तसेच २७ गावांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक पाणीकपात आहे.
Written by भगवान मंडलिक
First published on: 18-03-2016 at 03:17 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water crisis likely to hit students future