उन्हाळा नुकताच सुरू झाला आहे तोच मीरा-भाईंदरचे नागरिक पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. येत्या काही दिवसांत धरणांतील पाणीसाठय़ाची स्थिती आहे त्यापेक्षा वाईट झाली तर पाणी कपातीमध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे. पुढील तीन महिने मीरा-भाईंदर शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे.

आगामी ४ ते ५ वर्षांपर्यंतची पाण्याची गरज भागवणारी मीरा-भाईंदरची ७५ दशलक्ष लिटर पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतरही सध्या नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुरेसा साठा शिल्लक नसल्याने जुलै महिन्यापर्यंतच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्य़ात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मीरा-भाईंदरमध्ये दर १५ दिवसांनी एक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून पाण्याची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा नुकताच सुरू झाला आहे तोच पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. येत्या काही दिवसांत धरणांतील पाणीसाठय़ाची स्थिती आहे त्यापेक्षा वाईट झाली तर पाणी कपातीमध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे. त्यामुळे आगामी ३ महिन्यांचा सामना कसा करावा लागणार आहे याची झलकच सध्या पाहायला मिळत आहे.

मीरा-भाईंदरला आजपर्यंत लोकसंख्येच्या तुलनेत कधीही पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. २००० मध्ये शहरासाठी सुरू झालेली ५० दशलक्ष पाणीपुरवठा योजना ही याआधीची सर्वात मोठी पाणीयोजना होती. ही योजना पूर्ण होण्यासाठीही मोठी दिव्ये पार पाडावी लागली होती. मात्र त्यानंतरच्या १५ वर्षांत एकही मोठी पाणी योजना राबवण्यात आली नाही. एकदोन वेळा पाणीपुरवठय़ात थोडीफार वाढ झाल्याचा काय तो अपवाद, परंतु गेल्या १२ वर्षांच्या काळात मीरा-भाईंदरची लोकसंख्या झपाटय़ाने वाढली. मुंबईलगतचे शहर असल्याने आणि माफक दरात घरे उपलब्ध असल्याने नागरिकांची पहिली पसंती मीरा-भाईंदरला मिळू लागली. त्यामुळे नव्याने राहायला येणाऱ्यांचे लोंढे वाढू लागले  परंतु या वाढत्या लोकसंख्येला पाणीदेखील आवश्यक आहे याचा गांभीर्याने विचार झाला नाही. त्यामुळेच या ठिकाणी नागरिकांना कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

पाणीपुरवठय़ात वाढ होत नव्हती आणि टोलेजंग इमारती उभ्या राहून त्यांना नळजोडण्याही देण्यात येत होत्या. याचा परिणाम जुन्या नळजोडण्या असणाऱ्यांच्या पाणीपुरवठय़ावर होऊ लागला. त्यामुळे परिस्थिती अधिकच खराब होत गेली. त्यातच गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्य़ात दरवर्षी पाणीकपात लागू केली जात आहे. मुंबईनंतर झपाटय़ाने वाढणारा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, परंतु जिल्ह्य़ातील वाढत्या नागरीकरणासोबत येथील पाणीपुरवठय़ाच्या साधनांमध्ये मात्र वाढ झाली नाही. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहे तेवढीच राहिली. त्यातच काही महानगरपालिका त्यांना मंजूर असलेल्या पाण्याच्या कोटय़ापेक्षाही अधिक पाणी उचलू लागल्या. पाण्याच्या या असमान वाटपाचा अपेक्षेप्रमाणे परिणाम दिसू लागला. त्यामुळे धरणात जितके पाणी आहे त्याचे नियोजन करण्याची निकड भासू लागली आणि पाणीकपात लागू करणे आवश्यक बनले.

ठाणे जिल्ह्य़ातील मीरा-भाईंदरसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी या प्रमुख महानगरपालिकांना ही पाणीकपात दरवर्षी लागू करण्यात येते, परंतु मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका यांच्यात मोठा भौगोलिक फरक आहे. बहुतांश महानगरपालिका या उल्हास नदीतून पाणी उचलत असतात. यासाठी जिल्ह्य़ातील टेमघर येथे मुख्य उदंचन केंद्र आहे. मीरा-भाईंदरचा अपवाद वगळता इतर महानगरपालिका  या उदंचन केंद्रांपासून जवळच्या अंतरावर आहे. मीरा-भाईंदर शहर मात्र एका टोकाला आणि दूर अंतरावर आहे. स्रोतापासून पाणी शहरापर्यंत येण्यासाठी कित्येक किलोमीटर अंतराची जलवाहिनी अंथरावी लागली आहे. पाणी कपातीदरम्यान इतर महानगरपालिकांना केवळ पाणीकपातीच्या वेळेतच टंचाई जाणवते, परंतु मीरा-भाईंदरला त्याची झळ पुढे आणखी काही दिवस सहन करावी लागते.

मीरा-भाईंदर हे पाणीपुरवठय़ाच्या शेवटच्या टोकाला असल्याने कपातीनंतर पाणीपुरवठा सुरू झाला की जलवाहिनी पूर्ण भरण्यास आणि पुरेसा दाब निर्माण होण्यासच दोन दिवस लागतात. त्यातच ७५ दशलक्ष लिटर पाणी योजना सुरू होण्याआधी नागरिकांना ४८ ते ५० तासांनी पाणी मिळत असे. पाणीकपातीमध्ये हा पुरवठा तब्बल ७२ तासांवर जाऊन पोहोचत असे. त्यामुळे शहरात पाण्याची स्थिती गंभीर होत असे. मीरा-भाईंदरचे हे चित्र दरवर्षी शासनापुढे मांडून मीरा-भाईंदरला पाणीकपातीमधून वगळा, असे गाऱ्हाणे घालावे लागत असे. शासनाला दया आलीच तर पाणीकपातीमधून सुटका मिळत असे, अन्यथा येथील परिस्थिती स्फोटक होत असे.

मीरा-भाईंदरची ७५ दशलक्ष लिटर पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर या परिस्थितीत बदल होईल, अशी आशा होती. ७५ दशलक्ष लिटर पाण्यापैकी महापालिका केवळ ५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे तरी पाणीकपात सुरू होण्याआधी नागरिकांना दररोज ३० तासांनी पाणी मिळत होते. त्यामुळे पाणीकपातीदरम्यान १५ दिवसांनी एक दिवस पाणी बंद राहिले, तरी त्याचा परिणाम फारसा जाणवणार नाही, असे महापालिका प्रशासन छातीठोकपणे सांगत होते. मात्र झाले मात्र उलटेच. शहरातील अनेक भागांत पाण्याचा खडखडाट होऊ लागला आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ात वाढ झालेली असतानाही कपातीदरम्यान अशी परिस्थिती का उद्भवत आहे, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.