अंबरनाथः वाढणारे तापमान आणि पर्यायाने वाढणाऱ्या पाणी मागणीवर पर्याय उपलब्ध नसल्याने अखेर अंबरनाथ शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण उन्हाळा पाणी पुरवण्यासाठी अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागात चक्राकार पद्धतीने पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार अंबरनाथ पश्चिमेत एक दिवसाआड तर पूर्व भागात कोणत्या न कोणत्या भागात एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथकरांना एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा जाणवू शकतात. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येते आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्याने सर्वांनाच घामाघुम केले आहे. ठाणे जिल्ह्याचे तापमान सरासरी ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत असल्याने परिणामी वातानुकुलीत यंत्रणा आणि पाण्याची मागणी वाढल आहे. पाण्याची वाढलेल्या मागणीमुळे उपलब्ध पाणी जून अखेरपर्यंत टिकवण्यासाठी अंबरनाथ शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जल व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अंबरनाथ शहरातल्या पू्र्व भागात कोणत्या न कोणत्या भागात एक दिवस पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. सोमवार ते रविवार आठवडाभर एका भागात पाणी पुरवठा बंद असेल. तर अंबरनाथ पश्चिमेत एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असेल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे आता अंबरनाथकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी वाढलेली आहे. त्याचवेळी पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण भागात समसमाण पाणी वाटप करणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीने ही पाणी कपात केली जाणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.

असे आहे कपातीचे वेळापत्रक

सोमवारी अंबरनाथ पूर्वेतील बी-केबीन रोड, दत्त कुटीर, वडवली मार्केट, ताडवाडी, विमको सोसायटी, दशनाम गोसावी सोसायटी या भागांचा पाणी पुरवठा बंद राहील. तर हाल्याचा पाडा, ए.एम.पी. गेट (रेल्वे परिसर), बी-केबीन रोड, समाजसेवा सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, पुनर्जीवन सोसायटी या भागांचा पाणी पुरवठा दर मंगळवार बंद राहील. कानसई विभाग, कानसई गांव, भिडेवाडी, ए.एम.पी. गेट या भागांचा पाणी पुरवठा दर बुधवार बंद असेल. खेर सेक्शन, मोतीराम गार्डन, शिवबसव नगर या भागात दर गुरुवार बंद पाणी पुरवठा बंद राहील. साई विभाग, मोहन पुरम, देवप्रकाश गार्डन या भागांचा पाणी पुरवठा दर शुक्रवार बंद राहील. तर स्टेशन विभाग, टेलीफोन एक्सचेंज परिसर या भागांचा पाणी पुरवठा दर शनिवार आणि शिवगंगानगर, फार्मीग सोसायटी, मे फ्लॉवर गार्डन, शिवधाम कॉम्प्लेक्स परिसर या भागांचा पाणी पुरवठा दर रविवार बंद राहील, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सांगितले आहे.

बदलापुरकरांना तुर्तास दिलासा

अंबरनाथ शहरात पाणी कपात लागू केली असतानाच बदलापूर शहरात मात्र तुर्तास कोणतीही पाणी कपात केली जाणार नसल्याची माहिती प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने जाहीर सूचना दिल्यानंतरच कपातीचा निर्णय घेतला जातो, असेही प्राधिकरणाच्या वतीने कळवण्यात आले आहे.