ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा आज, शुक्रवारी बंद राहणार असून पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे काही भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात औद्योगिक विकास मंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनाकरिता लघु पाटबंधारे विभागाने १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाने शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे औद्योगिक विकास महामंडळामार्फत ठाणे शहरातील कोलशेत, बाळकुम, कळवा, विटावा, बेलापूर रोड, खारेगाव, मुंबई-पुणे रोड, मुंब्रा आणि कौसा परिसराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागांना पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.