आंद्र धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून पाणीकपातीचे संकेत
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने फारशी पाणीकपात होणार नाही, असे दावे एकीकडे केले जात असले तरी पुणे जिल्ह्यातील आंद्र धरणातील पाण्याची पातळी खालवत असल्याने या धरणातून बारवी धरणात पाणी सोडावे किंवा नाही यासंबंधी निर्णय घेण्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीची बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंद्र धरणात अधिक पाणीसाठा असला तरी पातळी खालावल्याने पाणीकपातीत वाढ करण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंबंधीची शक्यता व्यक्त केली आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बारवी धरणाची उंची तीन मीटरने वाढवण्यात आली असून मागील वर्षी झालेल्या उत्तम पावसामुळे यंदा पाणीकपात वाढवण्यात येणार नाही, असे दावे सुरुवातीला पाटबंधारे विभागामार्फत केले जात होते. नवी मुंबईचा अपवाद वगळला तर ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र धरण अस्तित्वात नाही. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीचे बारवी धरण आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीचे आंद्र या दोन धरणांतील पाणीसाठय़ावर जिल्ह्य़ातील बहुतांश शहरांना अवलंबून राहावे लागते. सद्यस्थितीत बारवी धरणात पाण्याची पातळी ६०.७१ मीटर इतकी असून पाणीसाठा १०८.४६ दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या धरणात ४८.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस बारवी धरणात जेमतेम २६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. बारवी धरणात पाणीसाठा मुबलक असला तरी आंद्र धरण परिसरात गेल्या वर्षी जेमतेम ६२ टक्के पाऊ स झाला. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस या धरणातील पाण्याची पातळी खालावू लागली असून ती ३२.४६ टक्के इतकी आहे.
मे महिन्यात कपात वाढणार?
बारवी धरण परिसरात मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा मार्च-एप्रिल महिन्यात नागरिकांना पाणीकपातीच्या झळा फारशा बसल्या नाहीत. गेल्या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये दोन दिवस तर काही ठिकाणी तीन दिवस पाणीकपात करण्यात आली होती. यंदा मार्च-एप्रिल महिन्यात केवळ १५ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.
या पाणीकपातीत मे महिन्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. टाटाच्या आंद्र धरणातून बारवी धरणात दरोरज सुमारे ५०० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते.
आंद्र धरण परिसरात गेल्या वर्षी ६२ टक्के पाऊ स झाला असून एप्रिल महिन्याअखेरीस धरणातील पाण्याची पातळी ३२.४६ टक्के राहिल्याने आगामी काळात आंद्र धरणातून बारवी धरणात कमी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. पावसाळा लांबल्यास सध्या एक दिवस सुरू असलेल्या पाणीकपातीत वाढ करण्याविषयी लघु पाटबंधारे विभागाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एमआयडीसीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. बारवी धरणात ४८ टक्के पाणीसाठा असून १५ जुलैपर्यंत हा पाणीसाठा पुरेल. असे असले तरी आंद्र धरणात ३२.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने तेथून मिळणारे ५०० एमएलडी पाणी बारवी धरणात सोडणे आता शक्य आहे का याची चाचपणी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे.
या शहरांना फटका
बारवी धरणातून वागळे इस्टेट, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, तळोजा आणि अतिरिक्त अंबरनाथ या औद्य्ोगिक विभागाला पाणीपुरवठा केला जातो, तसेच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर महापालिका व ग्रामपंचायतींना दररोज ७७० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.