ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या स्टेम प्राधिकरणाकडून दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बुधवारी २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू ठेवणार असून त्याचे विभागवार नियोजन करण्यात आल्याने ठाणेकरांना २४ ऐवजी १२ तास पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे.
ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यातील स्टेम प्राधिकरणाकडून दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे बुधवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ते गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ असा २४ तासांसाठी बंद असणार आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना पाणी टंचाईची समस्येचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन २४ ऐवजी १२ तासांच ठाणेकरांना होणारा पाणी पुरवठा बंद राहील या साठी पालिकेने नियोजन केले असूुन त्यासाठी ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेतील पाणी पुृरवठा सुरू ठेवुन त्याचे विभागवार नियोजन करणार आहे.
हेही वाचा >>>Badlapur sexual assault : ‘त्या’ आरोपीला न्यायालयीन कोठडी, आणखी
पालिकेच्या नियोजनानुसार घोडबंदर रोड, पवारनगर, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, कासारवडवली, विजयनगरी, विजय पार्क, राममंदिर रोड, मानपाडा, टिकूजीनीवाडी, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, यशस्वीनगर, मनोरमानगर, माजिवडा, कापूरबावडी, सोहम इस्टेट, उन्नती, सुरकुरपाडा, जयभवानी नगर आणि मुंब्रा रेतीबंदर या ठिकाणाचा पाणीपुरवठा बुधवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. समतानगर, ऋतूपार्क, सिध्देश्वर, आकृती, दोस्ती, विवियाना मॉल, वर्तकनगर, रुस्तमजी, नेहरूनगर, किसननगर-2, इटनिर्टी, जॉन्सन, जेल, साकेत इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवार, २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता ते गुरूवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपर्यत बंद राहील, अशा रितीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता पालिकेने वर्तविली आहे.