कल्याण : कल्याण पूर्व भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी दुर्गाडी किल्ला, पत्रीपूल भागातील गोविंदवाडी रस्त्यावरून जाते. या जलवाहिनीवर गोविंदवाडी भागातील म्हशींच्या तबेले मालकांनी अधिक संख्येने चोरीच्या नळ जोडण्यात घेतल्या होत्या. त्यामुळे कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. या चोरीच्या नळ जोडण्यांच्या तक्रारी प्राप्त होताच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून गोविंदवाडी भागातील मुख्य जलवाहिनीवरील चोरीच्या ६२ बेकायदा जोडण्या तोडून टाकल्या.

कल्याण पश्चिमेत दुर्गाडी किल्ला ते पत्रीपूल दरम्यानच्या गोविंदवाडी रस्त्यावर खाडी भागात अधिक प्रमाणात म्हशींचे तबेले आहेत. या तबेल्यांच्या माध्यमातून मोठा दुग्ध व्यवसाय अनेक वर्षांपासून चालतो. म्हशी चोवीस तास तबेल्यात बांधून ठेवण्यात येतात. त्यांना जागीच वैरण, पाणी दिले जाते. या सर्व व्यवस्थेसाठी तबेले चालकांना म्हशींचा गोठा स्वच्छ करणे, म्हशींना दररोज धुणे, त्यांना पाणी पाजण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी लागते. तबेल्यांना अधिकृत नळ जोडण्यांमधून होणारा पाणी पुरवठा पुरेसा पडत नसल्याने अनेक तबेला मालक पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून तबेल्यांमध्ये चोरून पाणी पुरवठा घेतात. दरवर्षी पालिका या भागात चोरीच्या नळ जोडण्यांवर कारवाई करते.

उन्हाळा सुरू झाला गोविंदवाडी भागातून कल्याण पूर्व भागात पाणी पुरवठा होणाऱ्या जलवाहिनीचा पाणी पुरवठा चोरीच्या नळ जोडण्यांमुळे कमी होतो. कल्याण पूर्वच्या अनेक भागात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती गोविंदवाडी येथील तबेले चालकांच्या चोरीच्या नळजोडण्यांमुळे होत असल्याने पाणी पुरवठा विभागाला दरवर्षी या भागात कारवाई करावी लागते. गोविंदवाडी भागातील मुख्य जलवाहिन्यांवर चोरीच्या नळ जोडण्या असल्याची माहिती मिळताच आयुक्त डाॅ. जाखड यांनी या जोडण्या तोडण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले.

गुरुवारी शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, शैलेश मळेकर, उपअभियंता महेश डावरे, राजेश गोयल, किशोर भदाणे, उदय सूर्यवंंशी, कनिष्ठ अभियंता देवेंद्र एकांडे, मयूर शिंदे, दयाराम पाटील यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने गोविंदवाडी भागातून गेलेल्या जलवाहिनीवरील तबेले मालकांनी घेतलेल्या चोरीच्या नळ जोडण्या तोडून टाकल्या. एक, दीड, दोन व्यासाच्या या जलवाहिन्या होत्या.दुर्गाडी किल्ला ते पत्रीपुलाजवळील सर्वोदय सोसायटी दरम्यान मुख्य जलवाहिनीवरून तबेले मालकांनी नळ जोडण्या घेतल्या आहेत, अशी माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करून या जलवाहिनीवरील ६२ नळ जोडण्या पाणी पुरवठा विभागाने खंडित केल्या.अनिता परदेशी शहर अभियंता.

Story img Loader