अंबरनाथः अंबरनाथ रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोनवरील छप्पर गळत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ऐन पावसाळ्यात आधीच गर्दीमुळे प्रवासी हैराण असताना ऐन लोकल पकडण्यावेळी गळक्या छपरामुळे प्रवासी ओलीचिंब होत आहेत. त्या गळक्या छपरातून येणाऱ्या पाण्यामुळे फलाटही निसरडा होतो आहे. त्यामुळे प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.
गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये जोरदार पाऊस पडतो आहे. या पावसामुळे विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचते आहे. यापासून रेल्वे स्थानकेही सुटलेली नाहीत. अंबरनाथ रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रशासनाची पावसाळीपूर्व तयारी पहिल्याच पावसात उघड पडली. अंबरनाथ रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोनमध्ये असलेल्या छपराला गळती लागल्याचे चित्र पहिल्याच पावसात समोर आले. छपरातून गळणारे पाणी तसेच छपराच्या खांबांवर जिथे आसन व्यवस्था केलेली असते अशा ठिकाणी पावसाचे पाणी थेट येत असल्याने प्रवाशांची कोंडी होते आहे.
हेही वाचा >>>घोडबंदरमधील भुयारी गटार योजनेत ५० कोटींचा घोटाळा? प्रकल्प खर्चात कपात होण्याऐवजी वाढ; मनसेचा गंभीर आरोप
लोकलची प्रतिक्षा करत असताना अचानक येणाऱ्या पावसामुळे प्रवासी ओलेचिंब होत आहेत. लोकल प्रवासात आधीच गर्दीमुळे प्रवासी त्रस्त असताना ओले होऊन लोकलमध्ये प्रवेश करावा लागतो आहे. त्यामुळे प्रवााशांत संतापाचे वातावरण आहे. तर छपरातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे फलाटही निसरडा होतो आहे. यामुळे प्रवासी घसरून पडण्याची भीती व्यक्त होते आहे. त्यामुळे गळके छप्पर दुरूस्त करण्याची मागणी होते आहे.