जलसंपदा विभागाचा निर्णय; भरपूर पाऊस होऊनही पाणी अपुरेच

सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही ठाणे जिल्ह्य़ातील जलाशयांमध्ये एकूण मागणीच्या तुलनेत पाच टक्के अपुरा पाणीसाठा आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी  आठवडय़ातील एक दिवस पाणीउचल थांबविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे त्या त्या शहरातील स्थानिक प्राधिकरणांना पाणी पुरवण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अपुरा पाणीसाठा हा २५ टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आल्याने त्याचा तितकासा परिणाम पाणीपुरवठय़ावर होणार नाही. त्यामुळे स्थानिक जल व्यवस्थापन करणाऱ्या प्राधिकरणांना आठवडय़ातून एकदा पाणी उचल थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २४ तास प्रत्येक प्राधिकरणाने पाणीउचल थांबवल्याने त्याच्या दूसऱ्या दिवशी त्याचा परिणाम जाणवू शकतो. मात्र पाणी नियोजन करण्यासाठीचा हा प्रयत्न असून स्थानिक पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांनी सहा दिवसांच्या पाण्यावर सातव्या दिवसाचे नियोजन करावे आणि पाणीसाठा टिकवावा, असे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पवार यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात याबाबत बैठक झाली असून दिवाळी सण असल्याने याबाबत अंमलबजावणी सुरू करण्यात आली नव्हती. मात्र येत्या काही दिवसांत याबाबत ठोस निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. आयएसआय मानकानुसार दिवसाला प्रति व्यक्ती १५० लिटर पाणी वापरणे योग्य असते. मात्र शहरी भागात प्रति व्यक्ती २५० ते ३०० लिटपर्यंत पाणी वापरले जाते. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठय़ावर त्याचा ताण पडतो. मात्र सध्याच्या वापरानुसारच नियोजन करायचे झाल्यास सध्या पाच टक्केच पाणीसाठा अपुरा असून त्याचा तितकासा परिणाम होणार नसल्याचेही पवार यांनी सांगितले आहे. तसेच ही कपात नसून पाण्याची उचल थांबवून नियोजन करणे आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नागरी भागात पाणीउचल रोखण्यासाठी शनिवार आणि रविवार हे दिवस टाळण्यात आले आहे. जेणेकरून नागरिकांना त्याचा जास्त परिणाम जाणवणार नाही.

या दिवशी उचल थांबवणार

  • अंबरनाथ- सोमवार
  • बदलापूर- सोमवार
  • उल्हासनगर- मंगळवार
  • कल्याण- मंगळवार
  • शहाड औद्योगिक क्षेत्र- मंगळवार
  • जांभूळ औद्योगिक क्षेत्र – शुक्रवार

Story img Loader