डोंबिवली – ठाकुर्ली चोळे भागातील पंचायत बावडी भागात रस्त्याच्या मध्यभागी असलेला जलवाहिनीवरून एक व्हॉल्व्ह मागील महिन्यापासून नादुरुस्त झाला आहे. या नादुरुस्त व्हॉल्व्हमधून सतत पाणी बाहेर पडून ते रस्त्यावरून वाहून जात आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या या पाण्यामुळे पादचारी, या भागातील व्यावसायिक, वाहन चालक त्रस्त आहेत.
हेही वाचा >>> ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ३ हजार ७४८ परवानाधारक अग्निशस्त्र जप्त
गेल्या दोन महिन्यांपासून हा व्हॉल्व्ह नादुरुस्त आहे. याविषयी पालिकेत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. पाणी सोडणारा पालिकेचा व्हॉल्व्हमन दररोज या भागात येतो. त्यांना ही पाण्याची गळती थांबविण्याविषयीची मागणी स्थानिकांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, फ प्रभागातील पाणी पुरवठा विभागाचे अभियंते या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी आहेत.
पालिका अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचे कारण देत प्रशासकीय, नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचे समजते. पालिका मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कनिष्ठ अधिकाऱ्यांवर वचक राहिला नसल्याने प्रभागातील अधिकारी, कर्मचारी मनमानीने स्थानिक पातळीवर कामे करत असल्याच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा >>> ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना जामीन
ठाकुर्ली चोळे भागातील पंचायत बावडी हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. एमआयडीसी, खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, भोईरवाडी, आजदे भागातील नागरिक चोळे गावातील रस्त्यावरून ठाकुर्ली रेल्वे स्थानक, डोंबिवली पश्चिमेत याच रस्त्याने जातात. या रस्त्यावर सतत पाणी गळती होत असल्याने वाहनांच्या वर्दळीने पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. दुचाकी स्वार या पाण्यात घसरून पडत आहेत. या सततच्या पाण्यामुळे या भागातील डांबरी रस्ता खराब होत आहे, अशा तक्रारी स्थानिकांनी केल्या. शहराच्या अनेक भागात नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. दुसरीकडे अशाप्रकारे पाणी फुकट जात असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.