डोंबिवली शहरातील मध्यवर्ति ठिकाणी असलेल्या शिवमंदिर स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावर ठेकेदाराने उंचवटा करुन नियमबाह्य पध्दतीने गटाराची बांधणी केली आहे. स्मशानभूमी अंतर्गत भागातून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावर पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मशानभूमीच्या दिवंगत सुनंदा सुमंत नातू प्रवेशव्दार ते अंतर्गत भागातील २५ फुटापर्यंत हे पाणी तुंबते. शुक्रवारी सकाळी पावसाच्या तुरळक सरी पडल्यावर प्रवेशव्दारावर अर्धा फूट पाणी तुंबले होते. पार्थिव घेऊन येणाऱ्या नागरिकांना या पाण्यातून स्मशानभूमीत जावे लागले. काही नागरिक जोखीम नको म्हणून शववाहिनी थेट स्मशानभूमीच्या अंतर्गत भागात नेऊन पार्थिव उतरवून घेत आहेत.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये दोन बहिणींची ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण

स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावर शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांच्या प्रयत्नातील रस्ता सुरक्षा कठडे भंगारासारखे आणून ठेवण्यात आले आहेत. स्मशानभूमीत येजा करणाऱ्या रुग्णवाहिका, नागरिकांना या भंगाराचा अडथळा होओ. स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावरील जलमय परिस्थिती पाहून नागरिक शहराची अवस्था बकाल करणाऱ्या राजकीय मंडळींविषयी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. शहरातील नागरिकांना २५ वर्षात सुविधा नाहीच, किमान देवाघरी जाणाऱ्याला तरी सुखासुखी जाण्यासाठी चांगला रस्ता ठेवा, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक शिवमंदिर स्मशानभूमीतील जलमय परिस्थिती पाहून देत आहेत.

मुसळधार पाऊस सुरू झाला तर शिवमंदिर स्मशानभूमीतील दफनभूमी, गॅस शवदाहिनीपर्यंत पाणी जाण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. परिसरात जळाऊ लाकडे ठेवण्यात आली आहेत. या वखारींमध्ये पाणी शिरले तर ओल्या लाकडांमध्ये पार्थिवाचे दहन कसे होईल, असे प्रश्न नागरिक करत आहेत.

हेही वाचा >>> अरुंद नाला आणि गटारांअभावी डोंबिवलीतील रागाई मंदिर परिसर पाण्याखाली

सामाजिक जाण असलेले काही नागरिक, स्मशानभूमीचा सुरक्षा रक्षक स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावरील तुंबलेल्या पाणी, गाळाचा त्रास नको म्हणून ते पाणी गटारातून किंवा अन्य काही भागातून सोडता येईल का यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे पुरेशी साधने नसल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. स्मशानभूमीत पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने तुंबलेले पाणी काढण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात नाहीत.

शहरप्रमुखाचा प्रभाग

शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक राजेश मोरे यांच्या प्रभागात शिवमंदिर स्मशानभूमी परिसर येतो. मागील चार महिन्यांपासून शिवमंदिर परिसरात गटारांची कामे सुरू आहेत. ही कामे अतिशय निकृष्ट, नियमबाह्य पध्दतीने बांधण्यात आल्याच्या तक्रारी यापूर्वीच नागरिकांनी केल्या आहेत. गटारे बांधण्यासाठी खडीचा चुरा (ग्रीट) सिमेंटमध्ये मिसळण्यात आला आहे. वाळूचा कोठेच वापर केल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. शिवमंदिर स्मशानभूमीत दररोज नागरिक पार्थिव घेऊन येणार आहेत, याचा विचार करुन येथील प्रवेशव्दारावरील गटाराची बांधणी, त्याला पाणी वाहून जाण्यासाठी ठेकेदाराने नियोजन करणे आवश्यक होते. असे कोणतेही नियोजन न केल्याने स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावर पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे

शुक्रवारी सकाळी एका शिवसैनिकाच्या वडिलांचा पार्थिव घेऊन नागरिक शिवमंदिर स्मशानभूमीत आले होते. त्यावेळी स्मशानभूमीतील जलमय परिस्थिती शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह शिवसैनिकांनी अनुभवली.

खासदार समर्थक शिवसेना पदाधिकाऱ्याच्या प्रभागातील स्मशानभूमीची दुरावस्था पाहून नागरिक चिड व्यक्त करत आहेत.

“ शिवमंदिर स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावर पाणी तुंबत असेल तर त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने प्रयत्न करतो.”

मंगेश सांगळे , कार्यकारी अभियंता,बांधकाम विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water logging in shiv mandir crematorium in dombivli zws
Show comments