ठाणे : बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविली आहेत. ही जलमापके भुरटे चोर चोरून नेत असून त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून सातत्याने समोर येत आहे. जलमापकामध्ये असलेला पितळचा धातू विकून चारशे ते पाचशे रुपये मिळत असल्याने ही चोरी केली जात आहे. गेल्या पाच वर्षांत शहरात १ हजार ५४१ जलमापके चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा होतो. नळजोडणीधारकांकडून ठराविक रक्कम देयकापोटी घेण्यात येत होती. अनेक ठिकाणी रस्ते आणि वाहने धुण्यासाठी पाण्याचा नागरिक वापर करत होते. या बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविले आहेत. २०१९ मध्ये शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्या सुरुवात झाली. महापालिका क्षेत्रात १ लाख १३ हजार ३२८ नळ जोडण्या आहेत. त्यातील १ लाख ५ हजार नळ जोडण्यांवर हे मीटर बसविण्यात आले आहेत. त्यापैकी ९० हजार नळजोडणीधारकांकडून जलमापकाद्वारे देयकांची वसुली करण्यात येत आहे. परंतु जलमापके चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.
हेही वाचा – कल्याणमध्ये रस्ते काम करणाऱ्या ठेकेदाराला बेदम मारहाण
हेही वाचा – कोकण पदवीधर निवडणुकीची शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून तयारी
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत १ हजार ५४१ जलमापके चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक चोरीचे प्रमाण कळवा परिसरात असून याठिकाणी ५९४ जलमापकांची चोरी झाली आहे. ही जलमापके भुरटे चोर चोरून नेत असून त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून सातत्याने समोर येत आहे. जलमापकामध्ये असलेला पितळचा धातू विकून चारशे ते पाचशे रुपये मिळत असल्याने ही चोरी केली जात आहे, अशी बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. जलमापक चोरीला गेल्यानंतर ग्राहकांना नवीन जलमापक बसवावे लागते आणि त्यासाठी ग्राहकांना ७ हजार २५० शुल्क भरावे लागते. यामुळे ग्राहकही हैराण झाले आहेत.
प्रभाग समिती – चोरीला गेलेले मीटर
दिवा – १३९
कळवा – ५९४
लोकमान्यनगर – २६४
माजिवडा – ३१
मुंब्रा – ९६
नौपाडा – ९३
उथळसर – ३६
वर्तकनगर – ५६
वागळे – २३२
एकूण – १५४१