पावसाळय़ापर्यंतच्या नियोजनासाठी जलसंपदा विभागाचा निर्णय
गेली दोन वर्षे कमी पावसामुळे पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या ठाणेकरांवर यंदा, चांगला पाऊस होऊनदेखील, जलसंकट ओढवले आहे. एप्रिलपासून जिल्ह्यतील प्रमुख शहरांमध्ये आठवडय़ातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि स्टेम यांना पाणीपुरवठा होत असतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून ठाण्यासह मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर महापालिकेला पाणीपुरवठा होतो. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंबरनाथ, बदलापूर या शहरांना तसेच स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी या महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा केला जातो.
जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला प्रतिदिन ५८४ दशलक्ष लिटर इतक्या प्रमाणात पाण्याचा उपसा करण्याची परवानगी आहे. मात्र, औद्योगिक आणि शहरी पट्टय़ाची गरज पाहता औद्योगिक विकास महामंडळाला दर दिवशी ७७५ दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी ९० दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी पाण्याची मंजुरी देण्यात आली असली, तरी या ठिकाणी ९५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. स्टेम प्राधिकरणाला २८५ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याचा पुरवठा होतो. मात्र स्टेमला २९५ दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी पाण्याची आवश्यकता आहे. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी प्रतिदिन २३५ दशलक्ष लिटर पाण्याची मंजुरी देण्यात आली असली, तरी या शहराची गरजही यापेक्षा अधिक आहे.
हे लक्षात घेऊन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाई भेडसावू नये यासाठी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जलसंपदा विभागाच्या वतीने केलेल्या पाहणीत ठाणे जिल्ह्य़ाला होणाऱ्या उपलब्ध पाणीपुरवठय़ात आणि आवश्यक असणाऱ्या पाणीपुरवठय़ात १५ टक्क्य़ांची तूट होती. यानुसार १ जानेवारी ते १८ मार्च या कालावधीत जलसंपदा विभागाकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ात दर पंधरा दिवसांनी पाणीकपात करण्यात येत होती. या पाणीकपातीनंतर ठाणे जिल्ह्य़ाच्या उपलब्ध पाणीपुरवठय़ात आणि आवश्यक पाणीपुरवठय़ात असणारी तूट सात टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आली. यानंतर एप्रिल महिन्यापर्यंत पाणीकपात दर आठवडय़ाला करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
पाणीकपात कुठे, कधी?
- एमआयडीसी क्षेत्रात दर शुक्रवारी
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या हद्दीत दर सोमवारी.
- कडोंमपाला दर मंगळवारी
- स्टेम प्राधिकरणाला दर बुधवारी, शुक्रवारी
उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर जलसंपदा विभागाला जुलै महिन्यापर्यंतच्या पाण्याचे नियोजन करावे लागते. नागरिकांच्या सोयीसाठीच ही पाणीकपात करण्यात येत असून पुढील महिनाभर दर आठवडय़ाला पाणीकपात केली जाईल. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक होऊन पाणीकपात बंद करणे किंवा सुरू ठेवणे याविषयी निर्णय घेण्यात येईल. मे महिन्यात बहुतांश पाणीकपात बंद करण्यात येते. तोपर्यंत पाणीकपातीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
– उमेशचंद्र पवार, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, ठाणे
(( ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खर्डी राजापुरी येथील पाणीटंचाईचे हे दृश्य. या गावाच्या शेजारूनच वाहणारी तानसा नदी अवघ्या मुंबईला पाणीपुरवठा करते. मात्र, गावातील ग्रामस्थांना जमिनीत पाच पाच फूट खाली खोदून पाण्याचा शोध घ्यावा लागतो. पाण्याचे आणि पाणीबचतीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देण्यासाठी गुरुवारी, २२ मार्च रोजी जागतिक पाणी दिन साजरा करण्यात आला. या दिवशीच टिपण्यात आलेले हे छायाचित्र शहरातील नागरिकांना ‘जलभान’ देणारे ठरावे! (छायाचित्र : दीपक जोशी) ))