कल्याण पूर्व तिसगाव नाक्यावरील प्रकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पूर्वेतील पुना लिंक सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी मलवाहिनीच्या झाकणातून पाण्याचे कारंजे उडत आहेत. हे कारंजे बंद करावेत म्हणून या भागातील जागरुक रहिवासी आयुक्त, स्थानिक अधिकाऱ्यांकडे मागणी करीत आहेत. परंतु, कुणीही अधिकारी या विषयाची दखल घेत नसल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येते.

या कारंजामुळे पुना लिंक रस्त्याच्या सिमेंटकरणाच्या कामातील त्रुटी उघड होऊ लागल्या आहेत. पुना लिंक रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुना लिंक रस्त्याखाली मल, जलवाहिन्या आहेत. सिमेंट रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी काही ठिकाणी वाहिन्या आहेत, त्या ठिकाणी कायम ठेवून कामे उरकण्यात आली आहेत. या कामांविषयी रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अखेर पाऊस सुरू झाल्यानंतर सिमेंट रस्ते कामातील त्रुटी उघड होऊ लागल्या आहेत.

तिसगाव नाक्यावरील एका हॉटेलच्या समोरील रस्त्यावर मलवाहिन्याच्या झाकणातून पाण्याचे कारंजे उडत आहेत. सिमेंट रस्त्याखाली पाच ते सहा फूट मलवाहिनी आहे. त्याच्या बाजूला जलवाहिनी आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे तुंबलेले पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने, ते आतल्या आत तुंबून मलवाहिनीच्या झाकणातून वर आले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारंजामुळे भररस्त्यात पाणी तुंबत आहे.

आयुक्त रवींद्रन यांच्या ही बाब समाज माध्यमातून निदर्शनास आणण्यात आली. त्या वेळी त्यांनी याप्रकरणी स्थानिक अधिकाऱ्यांना आदेश देऊन सुरूअसलेला प्रकार थांबविण्याचे आश्वासन दिले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अद्याप लक्ष घातले नसल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. याबाबतच्या माहितीसाठी प्रकल्प अभियंता किरण वाघमारे यांच्याशी संपर्क केला तो होऊ शकला नाही.