डोंबिवली : डोंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रातील रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोरील शिळफाटा सेवा रस्त्यावरील जलवाहिनी आज दुपारी पावणे तीन वाजता फुटली. एक तासाच्या कालावधीत शेकडो लीटर पाणी फुकट गेले. एक तासानंतर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी जलप्रवाह बंद करुन दुरुस्तीचे काम हाती घेतले.
या जलवाहिनीवरुन एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, २७ गाव परिसराला पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्याने या भागाला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर काही जागरुक नागरिकांनी तात्काळ एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. एक तास उलटला तरी अशाप्रकारची घटना घडली आहे का, याची माहिती घ्यावी लागेल अशी उत्तरे अधिकारी देत होते. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड बैठकीत व्यस्त असल्यानेही ते ही माहिती देऊ शकले नाहीत.
रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोर काटईकडून येणारी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीवरील व्हाॅल्व्ह उच्च दाबामुळे तुटला. त्यामुळे जलवाहिनीमधील पाणी रस्त्यावर वाहू लागले. दुपारी पावणे तीन ते चार वाजेपर्यंत पाणी रस्त्यावर वाहून चालले होते. शिळफाटा रस्त्यालगतची गृहसंकुले, एमआयडीसी, निवासी भागाला या वाहिनीवरुन पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने या भागाच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. चार वाजता अधिकाऱ्यांनी बारवी धरणाकडून येणारा जलप्रवाह बंद करुन दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. एक तासात हे काम पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुरुस्तीनंतर तात्काळ पाणी पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.