कल्याण शिळफाटा रस्त्यावरील दावडी जवळील व्यंकटेश पेट्रोल पंपा जवळ मंगळवारी रात्रीपासून एमआयडीसीची एक जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी फुकट गेले. या जलवाहिनीवरुन शिळफाटा रस्त्या लगतच्या गृहसंकुलांना पाणी पुरवठा केला जातो.शिळफाटा रस्त्यावर डोंबिवली एमआयडीसी जवळील दावडी गाव हद्दीत व्यंकटेश पेट्रोल पंपा जवळून एमआयडीसीची जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीतून दावडी ते पत्रीपूल दरम्यानच्या नागरी, औद्योगिक वस्तीला पाणी पुरवठा केला जातो. या जलवाहिनीला दावडी गावाजवळ एक हवा दाब नियंत्रक आहे. या नियंत्रकामधून दररोज होणाऱ्या पाणी गळती मधून परिसरातील झोपडपट्टी, फेरीवाले पाणी भरतात. या हवा दाब नियंत्रकाच्या ठिकाणी मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान मोठी गळती सुरू झाली. या जलवाहिनीवरुन कारंजे उडू लागले. परिसरातील नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयात रात्रीच कळविले. परंतु, तेथून प्रतिसाद मिळाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यानच्या काळात शेकडो लीटर पाणी वाया गेले.
हेही वाचा >>>पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
हेही वाचा >>> येत्या महिन्यापासून कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांचा गारेगार प्रवास
रात्रीची वेळ असल्याने आणि जलवाहिनी शहराच्या एका बाजुला असल्याने या फुटणाऱ्या जलवाहिनीकडे स्थानिक रहिवाशांव्यतिरिक्त कोणालाही माहिती नसल्याने हे पाणी बंद व्हावे म्हणून फार प्रयत्न झाले नाहीत, अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली. शिळफाटा रस्त्यावरील वाहन चालकांना हा प्रकार दिसत होता पण ते कोणाला संपर्क करू शकत नव्हते.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना ही माहिती बुधवारी सकाळी मिळताच त्यांचे दुरुस्ती पथक तात्काळ घटनास्थळी येऊन त्यांनी हवा दाब नियंत्रक दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. एक तासात हे काम पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत होईल. जलवाहिनीतून पाणी दाब वाढल्याने आणि हवा दाब नियंत्रका जवळ छिद्र मोठे झाल्याने पाण्याचे कारंजे उडाले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.