ठाणे : यंदा पाऊस लांबल्याने धरण क्षेत्रातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे शहरात पाणी कपात लागू केली असतानाच, दुसरीकडे गेल्या सात महिन्यांपासून शहरातील सावरकरनगर भागात जलवाहिनीच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी नाल्यातून वाया जात असल्याची बाब पुढे आली आहे. या भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने टंचाईचा सामना करावा लागत असतानाच जलवाहिनीच्या गळतीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> ठाण्याच्या मनोरुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा केला निषेध
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात. हे सर्व स्त्रोत ठाणे जिल्ह्यातील बारवी आणि भातसा धरणांमधून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करतात. परंतु या धरण क्षेत्रात पाणी साठा कमी असून त्यातच यंदा पाऊस लांबला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे शहरात पाणी कपात लागू केली आहे. यानुसार शहरात एमआयडीसीमार्फत होणारा पाणी पुरवठा दर शुक्रवारी बंद ठेवला जात आहे.
इतर स्त्रोतांकडूनही पाणी कपात होण्याची शक्यता आहे. असे असतानाच ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे जलवाहिन्यांच्या गळतीकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब नागरिकांनीच उघडकीस आणली आहे. ठाणे येथील सावरकरनगर भागातील जलकुंभाच्या छताला ५ एप्रिल २०२२ रोजी भगदाड पडले. या जलकुंभामध्ये कचरा पडू नये यासाठी तात्पुरत्या स्वरुपात प्लास्टीक कागद छतावर टाकण्यात आला होता. मात्र हा कागदही फाटला आहे. या छताच्या दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असून त्यापाठोपाठ आता येथील जलवाहिनीच्या गळतीकडेही पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. या जलकुंभातून इंदिरानगर, सावरकरनगर तसेच लोकमान्यनगर भागामध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो.
हेही वाचा >>> कळवा रुग्णालयातही आता बायोमेट्रीक हजेरी; कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसतो
याठिकाणी ५० हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. या लोकवस्तीसाठी हा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. तरिही येथील जलवाहीन्यांच्या गळतीकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. या जलकुंभापासून काही अंतरावर एक नाला असून त्याशेजारूनच जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यातून पाणी गळती होत आहे. जलकुंभावरून परिसरात पाणी सोडण्यात येते. तेव्हा फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून ते नाल्यातून वाया जाते. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही, असा आरोप ठाकरे गटाचे विभागप्रमुख राजीव शिरोडकर यांनी केला आहे. या संदर्भात ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अभियंता माधव जागडे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.