|| कल्पेश भोईर

चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीत घरोघरी पाणी योजनेसाठी हालचाली; प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविणार

वसई : नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना नळयोजनेतून अखेर घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात २ हजार ५०० कुटुंबांना नळजोडण्या देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपाडा- वाकीपाडा येथील रहिवासी घरोघरी नळ योजनेपासून वंचित आहेत.सध्या स्थितीत येथील नागरिकांना पाण्यासाठी पाझर तलाव हा एकमेव स्त्रोत आहे. याच तलावातून चंद्रपाडा-वाकीपाडा येथील भागात ग्रामपंचायतीकडून स्टॅण्ड पोस्टवर एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. घरोघरी नागरिकांना पाणी मिळावे, अशी मागणी अनेक वेळा ग्रामस्थांनी केली आहे.

नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत चंद्रपाडा येथील सभागृहात पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची विशेष बैठक पार पडली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, व समितीवर असलेले सदस्य उपस्थित होते. या झालेल्या बैठकीत शासनाच्या जल जीवन मिशन व ६९ गावांच्या पाणी योजनेतून घरोघरी पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. याच अनुषंगाने चंद्रपाडा ग्रामपंचायतीकडून पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात शासनाच्या जल जीवन मिशन या योजनेत प्रत्येक नागरिकांला दिवसाला साधारणपणे ५५ लिटर पाणी देणे बंधनकारक आहे. यानुसार या भागातील नागरिकांना ६९ गावांच्या पाणी योजनेतून ४ लाख लिटर व पाझर तलाव यातूनही जवळपास अर्धा एमएलडी इतक्या पाणी साठा उपलब्ध होणार आहे. तर  गावाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी पुरवठा करण्यासाठी इतर कोणते स्त्रोत  उपलब्ध करता येऊ शकतात. याचाही विचार सुरू असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.

नवीन जलकुंभ उभारणार

चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीत सध्या स्थितीत ६९ गावांच्या पाणी योजनेतून बांधलेला जलकुंभ अस्तित्वात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत व  उंच सखल असे भाग असल्याने ही घरोघरी नळयोजना कार्यान्वित करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी इतर ठिकाणी सुद्धा नव्याने जलकुंभ उभारणे गरजेचे आहे. यासाठी सुध्दा जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे नवीन मागणी करण्यात येणार आहे. तर पाझर तलाव येथे मोडकळीस आलेल्या जलकुंभ पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत चंद्रपाडा हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाच्या जल जीवन मिशन या योजनेतून प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे सादर केला जाईल.

– एस.एस.जाधव, ग्रामसेवक ग्रामपंचायत चंद्रपाडा

Story img Loader