लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार पिण्यायोग्य पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण ९५ टक्के इतके असणे अपेक्षित असताना, ठाणे महापालिकेने गेल्या तीन महिन्यात केलेल्या पाणी नमुने तपासणीत जुन्या ठाण्यातील नौपाडा-कोपरी, उथळसर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर भागातील पिण्यायोग्य पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण ९४ ते ९८ टक्के इतके असून या भागांमध्ये पाणी चांगले असल्याचे स्पष्ट होत आहे. तर, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर, मुंब्रा, कळवा, दिवा भागात पिण्यायोग्य पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण ८३ ते ८९ टक्के इतके असून येथील पाणी गुणवत्तेत घसरण झाल्याने येथील पाणी फारसे चांगले नसल्याचे तपासणीतून दिसून येत आहे.
राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरूवात झाली असली तरी ठाणे महापालिकेकडून मात्र गेल्या काही वर्षांपासून दर आठवड्याला पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. पालिकेच्या प्रभाग समिती स्तरावर पाणी नमुने गोळा करून त्याची तपासणी केली जाते. त्यासाठी घरातील नळांना येणारे पाणी आणि साठवून ठेवलेले पाणी असे दोन्ही नमुने घेतले जात आहेत. यामध्ये नळाद्वारे घेतलेले जाणाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य प्रमाण हे ९९ टक्क्यांच्या आसपास असते. तर, साठवून ठेवलेल्या पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण त्यापेक्षा कमी आढळून येते. काही वेळेस पिण्यायोग्य पाण्याची गुणवत्तेचे अशी माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
ठाणे महापालिका दरवर्षी शहरातील पिण्यायोग्य आणि पिण्याअयोग्य पाण्याचे किती नमुने तपासले आणि त्याच्या गुणवत्तेचे प्रमाण किती होते, याविषयीची माहिती पर्यावरण अहवालात प्रसिद्ध करते. २०२०-२१ या वर्षात पाण्याचे एकूण १४ हजार ३०५ नमुने तपासण्यात आले होते. पैकी १३ हजार ७५५ नमुने पिण्यायोग्य तर, ६२० नमुने पिण्या अयोग्य आढळून आले होते. त्यावेळी पाणी गुणवत्तेचे प्रमाण ९६ टक्के इतके होते. २०२१-२२ या वर्षात पाण्याचे एकूण १४ हजार ९०५ नमुने तपासण्यात आले. त्यात १४ हजार ११७ नमुने पिण्यायोग्य तर, ७८६ नमुने पिण्या अयोग्य आढळून आले होते. त्यावेळी पाणी गुणवत्तेचे प्रमाण ९५ टक्के इतके होते. २०२२-२३ या वर्षात पाण्याचे एकूण १३ हजार ०२४ नमुने तपासण्यात आले. यामध्ये १२ हजार ९९ नमुने पिण्यायोग्य तर, ९२५ नमुने पिण्या अयोग्य आढळून आले होते. त्यावेळी पाणी गुणवत्तेचे प्रमाण ९३ टक्के इतके होते. तर, यंदाच्या वर्षात गेल्या तीन महिन्यात केलेल्या पाणी नमुने तपासणीत पाणी गुणवत्तेचे प्रमाण हे ९२ टक्क्यांच्या आसपास आढळले आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता विनोद पवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
ठाणे महापालिकेने नोव्हेंबर २०२४ मध्ये ८४९ पाण्याचे नमुने तपासले. त्यात पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण ९१ टक्के तर, पिण्या अयोग्य पाण्याचे प्रमाण ९ टक्के आढळून आले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये १०९६ पाण्याचे नमुने तपासले. त्यात पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण ९१ टक्के तर, पिण्या अयोग्य पाण्याचे प्रमाण ९ टक्के आढळून आले आहे. जानेवारी २०२५ मध्ये १२४० पाण्याचे नमुने तपासले. त्यात पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण ९२ टक्के तर, पिण्या अयोग्य पाण्याचे प्रमाण ८ टक्के आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार पिण्यायोग्य पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण ९५ टक्के इतके आहे. परंतु पालिकेच्या आकडेवारीनुसार जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या पाण्याच्या गुणवत्तेच्या मानकापेक्षा ठाण्यातील पिण्यायोग्य पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण ३ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून येत आहे.
आकडेवारी
प्रभाग समिती | पिण्यायोग्य पाणी टक्केवारी | पिण्या अयोग्य टक्केवारी |
नौपाडा-कोपरी | ९४ टक्के | ६ टक्के |
उथळसर | ९८ टक्के | २ टक्के |
लोकमान्य-सावरकर | ८९ टक्के | ११ टक्के |
कळवा | ९१ टक्के | ९ टक्के |
मुंब्रा | ८७ टक्के | १३ टक्के |
वागळे इस्टेट | ९५ टक्के | ५ टक्के |
दिवा | ८८ टक्के | १२ टक्के |
वर्तकनगर | ८३ टक्के | १७ टक्के |
मानपाडा | ९५ टक्के | ५ टक्के |
एकूण | ९२ टक्के | ८ टक्के |