पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा

यंदा पाऊस कमी पडल्याने पालघर जिल्ह्य़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. जिल्ह्य़ातील महापालिका आणि इतर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा असल्याने जिल्ह्य़ातील रहिवाशांना दिलासा मिळालेला आहे.

पालघर जिल्ह्यात सूर्या नदीवर मोठा पाटबंधारे प्रकल्प असून त्यामध्ये धामणी आणि कवडास बंधाऱ्याचा समावेश आहे. या प्रकल्पात २८६.३१ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असून सध्या २७८.७३ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. याशिवाय वांद्री हा मध्यम पाटबंधारे प्रकल्प असून लघू पाटबंधारे प्रकल्पांतर्गत मनोर, माहीम-केळवे, देवखोप, रायतळी, खांड व मोहखुर्द असे प्रकल्प आहेत. यापैकी बहुतांश प्रकल्पांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने सध्या तरी पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश दुसाणे यांनी सांगितले.

सूर्या पाटबंधारे प्रकल्पामधील पाण्याच्या साठय़ांपैकी एकंदर २२६.९३ दशलक्ष घनमीटर पाण्यावर आरक्षण असले तरी सध्या ७० ते ७५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होत आहे. उर्वरित १४३ दशलक्ष घनमीटर पाण्यावर एमएमआरडीएचे आरक्षण असून या पाण्याची अजूनही उचल होत नसल्याने पाण्याचा सध्या मुबलक साठा उपलब्ध राहणार आहे. वसई-विरार महापालिकेला कवडास उन्नकही बंधाऱ्यामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा होत असून पाण्याच्या आवश्यकतेनुसार या धरणातून पाणी सोडण्यात कोणताही अडथळा नसल्याचे सांगण्यात आले. सूर्या प्रकल्पातून सिंचनासाठी डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून मे महिन्यापर्यंत १५ वेळा पाणी सोडण्यात येणार असून सिंचन क्षेत्रामध्ये रब्बी पिकाला त्याचा लाभ होऊ  शकेल.

शेतकऱ्यांना दिलासा

ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून पावसाने उघाड घेतली असल्याने खरीप पीक धोक्यात आले होते. एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून यंदा प्रथमच २० सप्टेंबरपासून सात ऑक्टोबपर्यंत घरातून खरीप सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. १९८६पासून हा सिंचन प्रकल्प सुरू झाल्यानंतर ३२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच या पाटबंधारे प्रकल्पातून खरिपाला पाणी दिले गेल्याने कालवा किनाऱ्याच्या शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.