वांद्री धरणातून १० दिवसांआधीच जलउत्सर्ग
यंदा पाऊस कमी झाल्याने पालघर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून पाणीच नसल्याने शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने वांद्रे प्रकल्पाचे पाणी १० दिवस आधीच सोडले असून तालुक्यात अनेक गावांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
यंदा अनियमित पाऊस झाल्याने पालघर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर पाणीटंचाई असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम वाया गेल्यामुळे शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडला आहे. तालुक्यातील गांजे-ढेकाळे येथे वांद्री मध्यम धर प्रकल्प आहे. या धरणातून दर वर्षी १५ डिसेंबर रोजी पाणी सोडण्यात येते. मात्र यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता पाटंबंधारे प्रकल्पाने १० दिवस आधीच पाणी सोडले आहे. ६ डिसेंबर रोजी पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. सफाळेच्या पूर्वेकडील भागात रब्बीचे भात पीक तसेच भाजीपाला लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. मुदतीआधीच वांद्री पाटबंधारे प्रकल्पातून मुदतीपूर्व सिंचनासाठी पाणी सोडल्याने शेतकरी आणि बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.
वांद्री धरण परिसरात पर्यटनाला मोठी संधी असून त्यामुळे या भागातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यासाठी प्रयत्न करणार आहे. – जगदीश धोडी, उपाध्यक्ष, कोकण पाटंबंधारे विकास महामंडळ