जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षानंतर मलवाडा, पीक ग्रामस्थांकडून उभारणी
वाडा तालुक्यातील पाण्याची कमतरता असल्याने पिंजाळ नदीवर मलवाडा येथे बंधारा बांधण्याची मागणी मलवाडा आणि पीक या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून आणि श्रमदान करून आठ दिवसांत या नदीवर बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे ग्रामस्थांचा पाणीप्रश्न मिटला आहे.
पिंजाळ नदीवर मलवाडा येथे अवघा एक मिटर उंचीचा आणि १०० मीटर रुंदीचा बंधारा बांधला तर येथील नदीपात्राच्या पाणीसाठय़ात मोठय़ा प्रमाणावर वाढ होऊन या परिसरातील अनेक गाव, पाडय़ातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा आणि या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला होणारा संभाव्य पाणीटंचाईचा धोका टळू शकतो, अशी विनवणी वारंवार पालघर जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाकडे मलवाडा व पीक ग्रामस्थांनी वारंवार केली. मात्र प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे या ठिकाणी स्वखर्चाने आणि श्रमदान करून बंधारा बांधण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
पीक येथील अभियंता पदवी घेतलेल्या प्रीतम पाटील या सुशिक्षित तरुणाने या बंधाऱ्याची आखणी करून मलवाडा आणि पीक येथील शेतकऱ्यांकडून लोकवर्गणी जमा केली. काही नागरिकांनी श्रमदान करून तब्बल आठ दिवसांत मलवाडा येथे पिंजाळ नदीवर एक मीटर उंचीचा आणि १०० मीटर रुंदीचा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे येथील नदीपात्रात पाणीसाठा होणार असून त्याचा शेतकऱ्यांना आणि स्थानिक ग्रामस्थांना फायदा होणार आहे.
या परिसरात अनेक जण कुक्कुटपालन व्यावसायात आहेत. त्यासाठी वारंवार पाण्याची गरज असते. त्याशिवाय या परिसरातील शेतकरी भाजीपाला, फुले यांची शेती करतात. संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन लोकवर्गणीतून बंधारा बांधला आहे. – नंदकुमार पाटील, पोल्ट्री व्यावसायिक, पीक