कल्याण – मागील चाळीस वर्षाच्या काळात कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा येथील जलवाहिन्यांची दुरूस्ती पालिकेने केली नाही. गंजलेल्या जलवाहिन्यांमधून अधिक प्रमाणात पाणी गळती होण्याबरोबरच घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. या प्रकरणाकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी या भागातील महिलांनी येथील पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता.बेतुरकरपाडा भागातील गंजलेल्या जुनाट जलवाहिन्या बदलण्याची कार्यवाही प्रशासनाने लवकर सुरू करावी. नवीन जलवाहिन्या या भागात टाकाव्यात. गंजलेल्या जलवाहिन्यांमधून दूषित पाण्याचा पुरवठा बेतुरकरपाडा भागातील घरांमध्ये होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पालिकेला यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे आम्ही हा निषेध मोर्चा पालिकेवर आणला आहे. त्याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी, असा इशारा राणी कपोते या महिलेने दिला आहे.बेतुरकरपाडा येथून महिला हातात हंडा, घागर घेऊन, भांड्यांचा गजर करत, पालिकेचा निषेध करत पालिकेसमोर आल्या होत्या. बेतुरकरपाडा भागात नवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. या संकुलांना बेतुरकरपाडा भागाचा पाणी पुरवठा चोरून दिला जात आहे, असा आरोप महिलांनी केला. बेतुरकरपाडा भागातील पाण्याचा एक थेंंब नवीन संकुलांंना देऊ नये, अशी मागणी महिलांनी केली.मोर्चाच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. लवकरच या कामाविषयी आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही सुरू केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.