बैठकीत आखला जाणार पाणी पुरवठ्याचा कृती आराखडा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्ष लिटर वाढीव पाण्यापाठोपाठ भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी टप्प्याटप्प्याने ठाणे शहराला उपलब्ध होऊ लागले आहे. असे असले तरी नियोजन अभावामुळे घोडबंदर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा आरोप होत असून याबाबत मुद्दा आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी महापालिकेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये घोडबंदरच्या पाणी पुरवठ्याचा कृती आराखडा ठरविला जाणार आहे.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis Live Updates : विधिमंडळ कामकाजाच्या महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर

हेही वाचा : सट्टेबाज सोनू जालानविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरीकरण झाले असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांकडून दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठा अपुरा पडू लागला असून यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर तसेच मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी ठाणे शहराला देण्याचा निर्णय नुकताच घेतला. या निर्णयानुसार मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याचा पुरवठा सुरु झाला असून त्याचे वितरण कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर करण्यात आले आहे. याशिवाय, भातसा आणि बारवी धरणातून टप्प्याटप्याने वाढीव पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. त्यातून दिवा परिसराला साडेसहा दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्यात येत आहे. तसेच ठाणे आणि घोडबंदर परिसरातही वाढीव पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. असे असले तरी घोडबंदर भागात पाणी टंचाईची समस्या कायम असल्याची बाब समोर आली असून हाच मुद्दा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधान सभेत उपस्थित केला.

घोडबंदर पट्ट्यात मोठमोठी गृहसंकुले उभारण्यास महपालिकेने परवानगी देताना त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मात्र चालढकल केली. परिणामी, लाखो रुपयांची कर्जे घेऊन घरखरेदी करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. यावर पालिकेमार्फत ठोस उपाययोजना होत नसल्याने टँकरलॉबीचे साम्राज्य वाढले आहे. या भागाला जोपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत पालिकेने नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये अशी ठाम भूमिका घेऊन लोक चळवळ उभी केली होती, असेही केळकर यांनी म्हटले आहे. या पट्ट्यातील पाच भागात दौरा करून पाणी समस्या जाणून घेतली. या दौऱ्यात निळकंठ ग्रीन, हिलक्रिस्ट, कॉसमॉस लौंज, पूजा गॅलेक्सी, लोढा स्प्लेनडर तसेच पाचपाखाडी आनंद सावली, धर्मवीर नगर या संकुलांमधील नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकांनी एकीकडे घर कर्जाचे हप्ते भरायचे, पालिकेची पाण्याची बिले भरायची आणि दुसरीकडे टँकरसाठी लाखो रुपये मोजायचे. हे किती दिवस चालणार, पालिका नागरिकांसाठी आहे की टँकर लॉबीसाठी, असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे. याबाबत अधिवेशनातही आवाज उठवला आहे. येत्या शुक्रवारी महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात पाणी टंचाईवरील कृती आराखडा ठरवण्यात येणार असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity ghodbunder area planning meeting municipality next friday ysh