दर बुधवारी शहरातील काही भागांत पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रातील पाणी साठा पुढील वर्षांच्या जुलैपर्यंत पुरविण्यासाठी जलसंपदा विभागाने १४ टक्के पाणी कपात लागू केली असून या कपातीमुळे कल्याण, अंबरनाथपाठोपाठ आता ठाणे महापालिकेनेही दर बुधवारी शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २४ तास पाणी बंद राहू नये म्हणून महापालिकेने विभागवार १२ तासांच्या बंदचे नियोजन केले आहे. मात्र, या बंदमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहिले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमार्फत दररोज ४८० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेची स्वत: ची योजना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम प्राधिकरण आणि मुंबई महापालिका या स्रोतांचा समावेश आहे. त्यापैकी महापालिकेची स्वत:ची योजना आणि मुंबई महापालिकेची योजना भातसा नदीच्या पात्रातून तर स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या योजना उल्हास नदीच्या पात्रातून राबवल्या जातात. स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी या दोन्ही स्रोतांकडून दररोज प्रत्येकी ११० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. ४८० पैकी २२० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा या दोन्ही स्रोतांकडून होतो. त्यामुळे हे दोन्ही स्रोत महत्वाचे मानले जातात. दरम्यान, पुढील वर्षांच्या जुलैपर्यंत उल्हासनदीच्या पात्रातील पाणी साठय़ाचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने १४ टक्के पाणी कपात लागू केली आहे. या निर्णयानुसार स्टेम प्राधिकरणाकडून दर बुधवारी ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आहे.

१२ तासांचे पाणी नियोजन

पालिका प्रशासनाने विभागवार १२ तास पाणी बंदचे नियोजन केले आहे. २४ ऑक्टोबरला सकाळी ९ ते रात्री ९ या १२ तासांत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्याच दिवशी रात्री ९ ते २५  ऑक्टोबरला सकाळी ९ असे १२ तास समतानगर, गांधीनगर, ऋतूपार्क, साकेत, महागिरी, उथळसर या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.