वन्यजीवांसाठी विंधण विहिरी खोदण्याचा निर्णय
यंदाच्या वर्षी पावसाने ओढ घेतल्याने राज्यभर दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असतानाच अतिशय कडक ऊन आणि जोडीला पाण्याची टंचाई यामुळे वन्यजीवांनाही खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाण्यातील येऊर जंगल, कर्नाळा अभयारण्य, महाबळेश्वर, पाचगणीच्या डोंगररांगांमधील जंगलांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीत प्रवेश करण्याचा धोका वाढू लागला आहे. राज्य सरकारने तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या असून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या जंगलांमध्ये तातडीने विंधन विहिरी तसेच सौर पंप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पाणीसाठे आणि पाणवठे तयार करण्याची नेहमीचीच कामे यंदा अधिक वेगाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख जंगलांचे युद्धपातळीवर सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
पावसाचे प्रमाण कसेही असले तरी सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या मध्यावर राज्यातील अनेक भागांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असते. यंदाच्या वर्षी काही भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात दुष्काळी आणि भीषण पाणी टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा फटका राज्यातील वनक्षेत्रांनाही बसू लागला आहे. वन विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या ढोबळ सर्वेक्षणानुसार प्रमुख जंगलांमध्ये यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दुष्काळाच्या झळा अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. मुंबईतील संजय गांधी उद्यान, ठाण्याचे येऊर जंगल तसेच आसपासच्या भागातील वनक्षेत्रातील पाणवठे आणि पाणीसाठे यंदा रोडावले असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या वन्यजीवांच्या संख्येत वाढ झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला असून मनुष्य आणि प्राण्यांमध्ये यामुळे संघर्षजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा