डोंबिवली- मुसळधार पाऊस सुरू असताना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तिनगर झोपडपट्टीत पाणी टंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या भागात सुमारे ५०० हून अधिक कुटुंब राहतात. पाणी नसल्याने रहिवाशांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. या पाण्यापासून काही आजार होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.
या झोपडपट्टीचा पाणी पुरवठा येत्या आठवडाभरात सुरळीत झाला नाही तर पालिकेवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, सचिव राजू शेख यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला. दोन आठवड्यापासून या झोपडपट्टीला कमी दाबाने पाणी येते. रहिवासी दररोज पाणी टंचाईच्या तक्रारी पालिकेत करतात. तरी त्याची दखल अधिकारी घेत नाहीत, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
या भागातील रहिवाशांचे प्रतिनिधी शशिकांत कांबळे, राजू शेख यांनी पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांची भेट घेतली. त्रिमूर्तिनगर भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिनीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाले की उच्च दाबाने नियमित पाणी पुरवठा या भागाला होईल, असे वाघमारे यांनी रहिवाशांना सांगितले.
भर पावसात पाणी टंचाईमुळे रहिवाशांना पावसाचे पाणी स्वयंपाक आणि पिण्यासाठी वापरण्याची वेळ यावी हे गंभीर आहे. या भागाचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे, असे रहिवाशांनी सांगितले. अधिकाऱ्याने असे काही घडले नसल्याचे सांगितले. पाणी पुरवठा डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी सांगितले, त्रिमूर्तिनगर झोपडपट्टीत गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते दोन दिवसात पूर्ण होईल. या भागाचा पुरवठा सुरळीत होईल.
खड्डे, तुंबणारे पाणी यामुळे नागरिक हैराण असताना आता पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना बढत्या, सोयीच्या बदल्या या व्यतिरिक्त नागरिकांच्या प्रश्नांची जाण आहे की नाही, असा प्रश्न या भागातील जाणकार नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.