भगवान मंडलिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण- मार्च नंतर पाणी टंचाईचे वेध लागणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील रहिवाशांना अनेक वर्षाच्या पाणी टंचाईच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेने केंद्र शासनाच्या जल जीवन योजनेतील ७८७ पाणी योजनांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील ५७५ पाणी योजनांच्या कामाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. उर्वरित कामांंचे आदेश लवकर देण्यात येणार असून, मार्च २०२४ अखेरपर्यंत ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>जळगाव, पालघर, ठाणे शहरांमध्ये वाहने चोरणारा सराईत चोरटा अटक

ठाणे जि्ल्ह्यातील मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि कल्याण तालुक्यांमध्ये केंद्र शासनाच्या जल जीवन योजनेंतर्गत या पाणी योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मार्च ते जून कालावधीत ठाणे जिल्ह्यात अनेक वर्षापासून पाणी टंचाई असते. धरणे, विहिरी, कुपनलिका आटतात. गाव परिसरातील ओहाळातील खळग्यातील पाण्यावर गावकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. आदिवासी पाड्यावरील रहिवाशांना डोंगर परिसरातील कपारीतून चढ उतार करुन पाणी आणावे लागते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यांमध्ये सुमारे दोनशे ते तीनशे पाणी वाहू टँकर तीन महिन्याच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून गावांमध्ये पाठविण्यात येतात. ग्रामीण भागातील घरातील पाण्याचा भार बहुतांशी महिलांवर असतो. शेती, घर अशी कामे करुन महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही त्रेधातिरपीट थांबविण्यासाठी जल जीवन योजनेतील प्रकल्प अधिक गतीने राबविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

हेही वाचा >>>ठाणे: जखमी श्वानावर उपचार सुरू असतानाच तिच्या पिलाचा अपघाती मृत्यू; ठाण्यातील पाचपाखाडी येथील घटना

मविआ सरकारच्या काळात जल जीवन योजनेचे काम थंडावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला गती देण्याचे आदेश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी ७८७ पैकी ५७५ पाणी योजनांना मंजुरी आणि कार्यादेश दिले आहेत. विहित वेळेत ही कामे करण्याची तंबी ठेकेदारांना देण्यात आली आहे. उर्वरित योजनांचे लवकरच आदेश काढले जाणार आहेत. जल जीवन योजनेतून प्रत्येक घराला नळ जोडणी आणि प्रति माणसी दररोज ५५ लीटर पाणी पुरवठ्याचे नियोजन आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
टंचाईची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी या योजना पूर्ण व्हाव्यात म्हणून ग्रामीण पुरवठा अधिकाऱ्यांबरोबर प्रकल्प संचालक जल जीवन मिशन दादाभाऊ गुंजाळ, समाज विकास अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाच्या अंतर्गत जिल्ह्यातील जल जीवन योजनेतील कामांच्या गतीचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. ही कामे मार्च २०२४ अखेरपर्यंत करण्याचे नियोजन आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>“गुंडांकडून आमच्यावर हल्ले करता, हेच तुमचं हिंदुत्व”, शिवसेनेचा शिंदे गटाला सवाल; म्हणाले, “अंगावर यायचे तर…”

“ जलजीवन योजनेची अंमलबजावणी गतिमानतेने होण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा टंचाई मुक्त करण्यासाठी हे अभियान आहे. या योजनेतील बहुतांशी कामांचे कार्यादेश दिले आहेत. उर्वरित आदेश लवकरच दिले जातील. जिल्हा टंचाई मुक्त करण्यावर भर असेल.-मनुज जिंदल,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, ठाणे

” मार्च अखेरपर्यंत जल जीवन योजनेतील योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक गाव, आदिवासी पाडा या योजनेतून पाणी टंचाई मुक्त होणार आहे.”-अर्जुन गोळे,कार्यकारी अभियंता,पाणी पुरवठा योजना

(मे नंतर कोरडे पडणारे बंधारे.)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water schemes routed in five talukas of thane district amy