अंबरनाथः अंबरनाथ शहराला भेडसवणाऱ्या पाणी टंचाईचा फटका गेल्या तीन दिवसांपासून अंबरनाथ रेल्वे स्थानकालाही बसतो आहे. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकातील पिण्याच्या पाण्याचे नळ आणि शौचालय कोरडे पडले होते. शौचालयात पाण्याअभावी दुर्गंधी पसरली होती. शुक्रवारी सकाळच्या सुमारास संतप्त प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापकांचे कार्यालय गाठून त्यांच्याकडे तक्रार दिली. एकीकडे मुसळधार पाऊस असताना दुसरीकडे शौचालयात पाणी नसल्याने प्रवाशांची कुचंबना होत होती. अखेर शुक्रवारी रेल्वे स्थानक प्रशासनाने टँकरने पाणी आणून पाणी पुरवले. चाकरमान्यांचे शहर म्हणून परिचीत असलेल्या अंबरनाथ रेल्वे स्थानकात गेल्या काही वर्षात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील सुविधांवर ताण पडतो आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी नसल्याचे समोर आले आहे.
पाण्याअभावी रेल्वे स्थानकातील पिण्याच्या पाण्याचे नळ आणि शौचालय कोरडे पडले आहेत. स्वच्छतागृह आणि शौचालयांत पाणी नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांची कुचंबना होते आहे. गेल्या तीन दिवसांपासून स्थानकात पाणी नसल्याने प्रवाशांच्या संतापाचा आज उद्रेक झाला. सकाळच्या सुमारास काही प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात धाव घेत त्यांना जाब विचारला. त्यामुळे स्थानक व्यवस्थापकांनी शुक्रवारी अखेर पाण्याचा टँकर मागवत स्थानकात पाणी पुरवले. त्यामुळे शौचालयाची सुविधा सुरू करण्यात आली. मात्र पाणी टंचाईचा हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी आता होते आहे. तर रेल्वे स्थानकात दररोज केवळ दीड तास पाणी पुरवठा होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. शौचालयात पाण्याची मागणी अधिक आहे. मात्र दोन दिवस पाणी आले नसल्याने ही वेळ आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.