नदीकाठच्या खड्डय़ांमध्ये झिरपून उल्हास नदी आटली
उल्हास नदीच्या पात्रात सुरू असलेल्या बेकायदा पाणीउपशामुळे शहरांवरील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असल्याची माहिती आता उघड होत आहे. नदी काठावर रेती माफियांनी केलेल्या बेसुमार उपशामुळे निर्माण झालेल्या खड्डय़ांमध्ये पाणी झिरपत असल्याने उल्हास नदीच्या पात्रातील पाणीपातळी खालावत चालल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर मे महिन्यापूर्वी नदीतील पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात कमी होईल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी, कल्याण- डोंबिवली व इतर स्थानिक संस्थांचा पाणीपुरवठा शनिवार, रविवार या एकाच दिवशी बंद ठेवण्यात यावा, असे आदेश लघुपाटबंधारे विभागाने काढले. त्याप्रमाणे पालिका, एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येऊ लागला. यामुळे बारवी किंवा आंध्र धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा उल्हास नदीत आठवडाभर जो पाण्याचा प्रवाह वाहत असायचा तो अचानक शनिवार, रविवार बंद होऊ लागला आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी खाली जाऊ लागली आहे. या संधीचा गैरफायदा घेऊन रेतीमाफियांनी रात्रंदिवस नदीपात्रात खड्डे खणून, रेतीचा उपसा सुरू केला आहे. रविवारी रात्री जेव्हा बारवी धरणातून उल्हास नदी पात्रात पाणी सोडण्यात येते त्या वेळी हे पाणी रेतीमाफियांनी नदी पात्रात खणलेल्या भव्य खड्डय़ांमध्ये झिरपू लागल्याचे निरीक्षण पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी नोंदविले आहे. दोन दिवस नदी पात्र कोरडे ठणठणीत असल्याने सोडलेले पाणी पात्रात जिरू लागले आहे. त्यामुळे धरणापासून ते एमआयडीसी, पालिका ज्या ठिकाणी पाणी शहरांना पुरविण्यासाठी उचलते त्या ठिकाणी पाणी पोहोचण्यास विलंब होऊ लागला आहे. रविवारी रात्री धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर महापालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व स्थानिक संस्था नदीतून सोडलेले पाणी उचलण्यासाठी एकाच वेळी पंप सुरू करू लागले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडून पडले आहे, असे एमआयडीसीच्या सूत्राने सांगितले.

’ बारवी धरणात ५६ टक्के पाणी साठा आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशाप्रमाणे पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. आता उद्भवलेली पाणीटंचाई पाहता येणाऱ्या काळात पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे पाणी बंद ठेवण्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती एमआयडीसीचे उपअभियंता सावळे यांनी दिली.
’ कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी मोहने येथे उदंचन केंद्राजवळ उल्हास नदीची पाण्याची पातळी ५० सेंमी असावी लागते. ती सध्या उणे ९८ झाली आहे. पाणी उचलण्यासाठी नदी पात्रात पाणीच नसल्याने त्याची झळ बसत आहे, अशी माहिती पालिकेचे जलअभियंता अशोक बैले यांनी दिली.

Story img Loader