ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात होणारा पाणी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे प्रशासनाकडून सर्वच भागांमध्ये दररोज पाणी पुरवठ्यात कपात करण्याऐवजी पंधरा दिवसातून एकदाच कपात केली जाते आणि त्यासाठी पंधरा दिवसातून एकदा ठरलेल्या भागांचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवला जातो. परंतु सण-उत्सवांमुळे पाणी पुरवठा सुरूच ठेवण्यात आल्यामुळे पालिकेचे पाणी नियोजनाचे गणित बिघडले असून यामुळे ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा अशा सर्वच भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. यावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेकडू ५० दशलक्षलीटर वाढीव पाणी मिळविण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू असले तरी, त्यात फारसे प्रशासनाला फारसे यश अद्याप मिळालेले नाही. पाणी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे सर्वच भागांमध्ये दररोज एक ते दोन दशलक्षलीटर इतके पाणी कमी द्यावे लागते. यामुळे नागरिकांना दररोज पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांना टंचाईचा समस्येचा सामना करावा लागतो. त्यावर उपाययोजना म्हणून ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सर्वच भागांना पुरेसा पाण्याचा पुरवठा केला जातो आणि दररोज येणारी पाण्याची तुट भरून काढण्यासाठी पंधरा दिवसातून एकदाच १२ तासांसाठी पाणी कपात केली जाते. यामुळे नागरिकांना दररोज ऐवजी पंधरा दिवसातून एकदाच पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. परंतु गुढीपाडवा, रमजान या सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने नियमित पाणी पुरवठा सुरू ठेवला आणि यामुळे पालिकेचे पाणी नियोजनाचे गणित बिघडल्याने शहरात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

टँकरची मागणी वाढली

ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी टंचाईग्रस्त भागात प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत हा पाणी पुरवठा करण्यात येतो. शहरात दिवसाला टँकरच्या ४० ते ४५ फेऱ्या होत आहेत. याशिवाय, शहरात खासगी टँकरद्वारेही पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यांचीही मागणी वाढली आहे. खासगी टँकर चालकाकडून एका टँकरच्या पाणी पुरवठ्यासाठी २५०० रुपये आकारले जात आहेत. घोडबंदर तसेच ठाणे शहरातील संकुलांमध्ये टँकरने पाणी विकत घेण्याची मागणी वाढली आहे.

कळवा-मुंब्य्रातही पाणी टंचाई

गेल्या काही दिवसांपासून संपुर्ण ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर राष्ट्र्वादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेेतली. पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा नियमित आणि सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, राज्य शासन शाई धरण हे ठाणे महापालिकेला देत होते. त्यावेळेस त्याचा खर्च ४५० कोटी रुपये इतका होता. परंतु ठाणे महापालिकेने हे धरण तेव्हा घेतले नाही. ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमुळे हे धरण होऊ शकले नसून त्यामुळेच शहरात ही अवस्था निर्माण झाली आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

कोणत्या भागाला किती पाणी पुरवठा होतो?

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर म्हणजेच माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ११५ दशलक्षलीटर, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात ५३ दशलक्षलीटर, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात ४५ दशलक्षलीटर, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात ५५ दशलक्षलीटर, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ५१ दशलक्षलीटर असा एकूण ५८५ दशलक्षलीटर इतका प्रतिदिन पाणी पुरवठा होतो.