लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: घोडबंदर भागातील गृहसंकुलांसाठी ५० दशलक्ष लीटर इतका वाढीव पाणी पुरवठा मंजूर झाला असला तरी तो कागदावरच असल्याने येथील ३० गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार संजय केळकर पालिका कारभारावर प्रश्न उपस्थित करत पाणी समस्येवर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा पुन्हा एकदा आरोप केला आहे. महापालिकेने नविन इमारतीना परवानगी देणे बंद केले पाहीजे, अशी मागणी करत येत्या दहा दिवसात पाण्याचे नियोजन केले नाहीतर स्वतः रस्त्यावर उतरून ठाणे महापालिकेवर लाँग मार्च काढेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले आहेत. येथील लाखो आणि कोटी रुपयांची घरे घेणाऱ्या नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. या संदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर हे सातत्याने आवाज उठवीत असून त्याचबरोबर त्यांनी प्रशासनासोबत बैठका घेण्याबरोबरच मोर्चे काढले. तसेच, विधीमंडळातही आवाज उठवला. तरीही परिस्थितीत बदल झालेला नसल्याची बाब पुढे आली आहे. घोडबंदर भागातील ३० गृहसंकुलातील रहिवाशांना पाणी टंचाई समस्या जाणवत असून या संदर्भात रहिवासियांनी आमदार केळकर यांची बुधवारी भेट घेतली. आमदार केळकर यांनी रहिवाश्यासमवेत महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वस्तुस्थिती मांडली.
आणखी वाचा- डोंबिवलीत रात्रीच्या वेळेत पाण्याची चोरी, शेकडो लीटर पाणी फुकट
घोडबंदर रोडवरील गृहसंकुलांसाठी ५० दशलक्ष लीटर इतका वाढीव पाणी पुरवठा मंजूर झाला असला तरी तो केवळ कागदोपत्री मंजुर आहे. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणीच झालेली नसल्यामुळे येथे टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. घोडबंदरच्या सुमारे ३० इमारती टँकरसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम मोजत आहेत, असा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे. पाण्याची इतकी टंचाई असताना महापालिका मात्र नवनवीन बांधकामांना परवानग्या देत आहे. उच्च न्यायालयात याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने पुरेसे पाणी पुरवता येत नसेल तर, नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. त्यावर ठाणे महापालिकेने पुरेसा पाणी पुरवठा करू, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. तरीही ठाणे शहरातील अनेक भागात आजही पाणी टंचाई असूनही पालिका बहुमजली इमारतींना परवानगी देत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. शहरात ५० मजल्यांच्या १५ इमारती आणि एक ७२ मजली इमारतीला परवानगी दिली आहे. आधीच पाणी टंचाई असताना या इमारंतींमधील हजारो नागरीकांना पाणी कसे पुरवणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून ही नवीन बांधकामे तात्काळ बंद करण्याची मागणी केली.
धरणाला पुढची १० वर्षे लागतील. त्यामुळे धरण धरण करीत बसण्यापेक्षा छोटे बंधारे उभारून कल्पकतेने नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच, येत्या १० दिवसाच्या आत हा परिसर टॅकरमुक्त करावा, अन्यथा, स्वतः रस्त्यावर उतरून हिरानंदानी इस्टेट ते ठामपा मुख्यालय असा लाँग मार्च काढू असा इशारा त्यांनी दिला आहे.