पाणी बंदबाबत महापालिकेने जनजागृती केलीच नाही
जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी बारवी धरणातून होणारा पाणी पुरवठा गुरुवार रात्रीपासून ते शुक्रवार रात्रीपर्यंत असा चोवीस तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला होता. परंतु या बंदमुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याबाबतची जनजागृती महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नव्हती. यामुळे पाणी बंदबाबत अनभिज्ञ असलेल्या कळवा, मुंब्रा आणि दिवावासियांना शुक्रवारी पाणी टंचाईच्या झळा बसल्याचे चित्र दिसून आले.
ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांना बारवी धरणातून एमआयडीसीमार्फत दररोज पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती व देखभालीचे तसेच जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रातील उन्नतीकरणाचे काम करण्याचा निर्णय एमआयडीसीने घे
हेही वाचा >>>ठाणे: जिल्ह्यातील तरुण मतदारांच्या संख्येत वाढ; ७९ हजार ५६२ ने जिल्ह्यातील तरुण मतदारांच्या संख्येत वाढ
तला. या कामासाठी गुरुवार रात्री १२ ते शुक्रवार रात्री १२ वाजेपर्यंत शहरांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे एमआयडीसीने जाहीर केले. त्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, तळोजा, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या शहरांचा समावेश असल्याचेही एमआयडीसीने म्हटले होते. परंतु ठाणे महापालिका हद्दीतील नेमक्या कोणत्या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, याबाबत पालिका प्रशासन जनजागृती करण्यात आली नाही. त्याचा फटका कळवा, मुंब्रा आणि दिवावासियांना बसल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>>मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर अपघातांमध्ये वाढ, दोन वर्षात तब्बल इतक्या मृत्यूंची नोंद
ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा या तिन्ही भागात १३५ दशलक्षलीटर इतका दररोज पाणी पुरवठा करण्यात येतो. याशिवाय, महापालिकेच्या योजनेतून कळवा आणि मुंब्रा भागात ४५ ते ५० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार असेल तर महापालिका प्रशासन प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना तशी माहिती देते. तसेच टंचाईच्या झळा बसू नयेत यासाठी पर्यायी व्यवस्था कशी असेल याचे नियोजनही जाहीर करते. परंतु एमआयडीसीकडून जलवाहीनी दुरुस्ती कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याबाबत महापालिकेने कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात जनजागृती केलीच नाही. त्यामुळे पाणी पुरवठा बंदबाबत बंदबाबत अनभिज्ञ असलेल्या कळवा, मुंब्रा आणि दिवावासियांना शुक्रवारी पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागल्याचे दिसून आले.
एमआयडीसीने जलवाहीनी दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला असून शनिवार सकाळपर्यंत हा पाणी पुरवठा सुरु होणार आहे. तसेच कळवा, मुंब्रा दिवा भागात एमआयडीसीचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला असला तरी या भागात महापालिकेच्या योजनेतून पाणी पुरवठा सुरु ठेवण्यात आलेला आहे. दिवा भागात मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने या भागाचा पाणी पुरवठा बंदच आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.