लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वच भागात पाणी टंचाईची समस्या गेल्या काही महिन्यांपासून जावणवत असतानाच, घोडबंदर भागातील आदिवासी पाड्यांवर ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे पाणी मिळावे, या मागणीसाठी श्रमजिवी संघटनेने बुधवारी महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर हंडा मोर्चा काढला होता. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने यावेळी दिला.
ठाणे महापालिका क्षेत्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येते. घोडबंदर भागातील या उद्यानाच्या डोंगर पायथ्याशी आदिवासी पाडे आहेत. याठिकाणी पानखंडा, बाबनोली पाडा, कशेळीपाडा, देवाचापाडा, सातपाडा यासह इतर असे एकूण १३ आदीवासी पाडे आहेत. वनविभागाच्या हद्दीत असलेल्या या पाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने दोन वर्षांपुर्वी जलवाहिन्या टाकल्या पण, त्याद्वारे अद्यापही पाणी पुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. तसेच या भागांमध्ये पालिकेने कुपनलिकाही उभारलेल्या आहेत. मात्र, त्या कुपनलिकांना देखील आता पाणी येत नाही. या पाड्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यंदा तीव्र उन्हामुळे ही समस्या आणखी बिकट झाली आहे.
मे आणि जून महिन्यात ही समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने बुधवारी भर दुपारी उन्हात पालिकेच्या मानपाडा-माजिवाडा प्रभाग समितीवर मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये आदीवासी महिलांनी रिकामा हंडा आणि मडका दाखवून प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी प्रभाग समितीचे उपायुक्त दिनेश तायडे यांना श्रमजीवीच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले आहे.
प्रत्येक कुटुंबाला त्याच्या राहत्या घरात नळ जोडणी तातडीने मंजुर करुन पाणी टंचाई मुक्त गावपाडे करण्यास कालबध्द कार्यक्रम ठरविण्यात यावा. जागेचा अडथळा येत असले अशा ठिकाणी कुपनलिकेद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सुरु असलेल्या जलवाहीनीला वाढीव नळ जोडणी करण्यात येऊ नये, ज्या भागात जलवाहीन्या लहान आहेत, त्यांची क्षमता वाढवून पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून पाड्यांवरील समस्या सोडविण्याचे आश्वासन पालिकेतर्फे यावेळी देण्यात आले. या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने यावेळी दिला.