विहिरींनी तळ गाठला; गडावरील अन्य पाणी व्यवस्था तुटपुंजी, पाण्याचे पिंपही महाग
पाणीटंचाईच्या झळा शहर, गाव, वाडय़ांना बसत असतानाच डोंगरमाथ्यावर असलेल्या मलंगगडावरील वस्तीलाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गडावरील स्थानिक रहिवाशांना दैनंदिन गरजांसाठी पाणी लागते, त्याचबरोबर दीड ते दोन तास डोंगर चढून गडावर येणारे पर्यटक गडावर आल्यावर पाण्याची मागणी करतात. त्यामुळे गडावर नेहमीच पाण्याची गरज भासते. गडावरील उपलब्ध पाणीसाठा रहिवासी तसेच पर्यटकांची तहान भागविण्यासाठी खूपच तुटपुंजा आहे. अशा परिस्थितीत मलंगगडावर पाण्याने भरलेला २०० लिटरचा एक पिंप ३०० रुपयांना विकला जात आहे. शुद्ध पाण्याची बाटली २५ ते ३० रुपयांना विकली जात आहे.
येत्या दोन महिन्यांत पाण्याची गरज वाढत जाईल आणि विहिरींमधील पाणीसाठाही आटत जाईल. त्या वेळी गडावरील पाण्याचा हा दर आणखी वाढेल, अशी भीती येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत. मलंगगडावर देशाच्या विविध भागांतील वेगवेगळ्या जाती, धर्मातील भाविक येत असतात. दररोज दोनशे ते तीनशे भाविकांची ये-जा गडावर असते. सुट्टय़ांच्या काळात हे प्रमाण वाढते. कल्याण शहरापासून अर्धा तास अंतरावर हे पर्यटनाचे ठिकाण आहे. मलंगगडाच्या पायथ्याला उतरले की डोंगराचा उभा वळणी वाटांचा चढ चढण्यासाठी दीड ते दोन तास लागतात.
गडावरील पाण्याची सुविधा
मलंगगडावर बाराशे कुटुंबांची लोकवस्ती आहे. गडावर एकूण १६ विहिरी आहेत. त्यामधील २ विहिरी सार्वजनिक आहेत. गडावरील समाधिस्थानापासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगरांच्या सुळक्यांच्या कडेला पुरातन काळातील जुनाट तीन ते चार पाण्याच्या टाक्या आहेत. पावसाळ्यात या टाक्या पाण्याने भरून राहतात. या टाक्यांपासून गडावरील मलंग वस्तीपर्यंत पाण्याची वाहिनी टाकण्यात आली आहे. गडावर पाणीटंचाई निर्माण झाली की या जलकुंभांमधील पाण्याचा वापर केला जातो. हा पाणीसाठा तुटपुंजा असल्याने तो सुरक्षित ठेवण्याकडे वस्तीवरील रहिवाशांचा कल असतो. सध्या गडावरील विहिरींनी तळ गाठला आहे. अद्याप कडक उन्हाळ्याचे दोन महिने गडावर काढायचे आहेत. लोकवस्ती आणि पर्यटकांना पाणीपुरवठा कसा करता येईल याचा विचार गडावरील व्यावसायिक पद्धतीने पाणी विक्री करणारे विक्रेतेकरीत आहेत.
गडावरील खासगी विहिरींचे मालक घर वापरासाठी आणि विक्रीसाठी विहिरीतील पाण्याचा वापर करीत आहेत. पाण्याचा २०० लिटरचा एक पिंप ३०० रुपयांना अन्य रहिवासी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, हातीगाडीचालक यांना विकला जातो. पाच ते सहा किलोमीटर उंचीच्या डोंगरावर पायथ्यापासून पाणी नेणे शक्य नाही. त्यामुळे गडावरील विहिरी, सुळक्याच्या पायथ्याच्या टाक्या, छोटा तलाव हाच मलंगवाडीला पाण्यासाठी आधार आहे. गड चढताना जागोजागी छोटी दुकाने, हॉटेल्स आहेत. या दुकानचालकांना दररोज भाविकांना पाणीपुरवठा करावा लागतो. भाविकांना शुद्ध पाणी लागते. त्यामुळे एक पाण्याची बाटली पंचवीस ते तीस रुपयांना विकली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडावरील सार्वजनिक विहिरींची संख्या वाढवली, या विहिरींचे झरे जिवंत केले, तर सार्वजनिक विहिरींत पाणीसाठा वाढू शकतो. कूपनलिका खोदण्याची गडावर व्यवस्था नाही. पण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कूपनलिकासारख्या सुविधा गडावर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. भाविकांची गडावर बाराही महिने वर्दळ असते. एक पर्यटन स्थळ म्हणून शासनाने पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करता कामा नये.
– वसंत पाटील, रहिवासी, मलंगवाडी

मलंगगड व पायथ्याला मिळून एकूण २४ विहिरी आहेत. सध्याच्या परिस्थितीत गडावर पाणीटंचाईची परिस्थिती नाही. गडावरील रहिवासी पाणी आटोपशीरपणे वापरतात. पाणीटंचाई आहे अशी माहिती प्राप्त झालेली नाही. गडाच्या पायथ्याला ऑस्ट्रेलियन पद्धतीचा एक लाख लिटर पाणी साठविणारा जलकुंभ बांधणीचे काम सुरू आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. गेल्या वर्षी या भागात पाणीटंचाई जाणवली नाही. अगदी मेअखेरला काही टँकर्सची सुविधा करावी लागली होती. गडावरील रहिवासी उपलब्ध पाणीसाठय़ाप्रमाणे पाण्याचा वापर करतात. त्यामुळे टंचाईचा प्रश्न येत नाही.
– अशोक सोनटक्के, गटविकास अधिकारी, अंबरनाथ